शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – ई-पीक पाहणी नोंदणीसाठी मुदतवाढ
अमळनेर : विक्की जाधव
खरीप हंगाम २०२५ अंतर्गत शेतकरी बांधवांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत नोंदणीची सुविधा उपलब्ध होती. मात्र अतिवृष्टी, दुबार पेरणी यांसारख्या कारणामुळे अनेक शेतकरी आपली नोंदणी करू शकले नव्हते. याची दखल घेत शासनाने शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. (अतिरिक्त ६ दिवस)

तसेच, उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी २१ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहाय्यक स्तरावरून पूर्ण केली जाणार आहे.त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही संधी साधून त्वरित आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन अमळनेर प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या कडून करण्यात आले आहे.