अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप : प्रभाग क्र. १२ वादग्रस्त
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवरून शहरात वादंग पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेत यावर्षी एक प्रभाग वाढवून १७ ऐवजी १८ करण्यात आले. मात्र या रचनेतील प्रभाग क्र. १२ वर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे सर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, नियमबाह्य व राजकीय हेतूने रचना केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
कंखरे यांनी दिलेल्या निवेदनात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली झाल्याचे नमूद केले आहे. प्रभाग क्र. १२ मध्ये नैसर्गिक सीमांचा विचार न करता रचना केली गेली, अनुसूचित जाती-जमातीचे विभाजन करण्यात आले तसेच ताडेपुरा वस्तीस दोन तुकड्यात विभागून प्रभाग ३ व १२ मध्ये जोडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय नदी, राजमार्ग यांसारख्या भौगोलिक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून सलगतेचा भंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रभाग रचनेविरोधात निवेदन देताना चंद्रकांत कंखरे सर, पत्रकार विक्की जाधव यांच्यासह पंकज चौधरी, पंकज भोई, राहुल कंजर, विपुल पाटील, विलास कंखरे, गोलू लांडगे, कुंदन पाटील, पारस धाप, राहुल पाटील, अक्षय अग्रवाल आदी उपस्थित होते. शहरातील नागरिकांमध्ये या रचनेबद्दल चर्चेला ऊत आला असून, आयोगाने तातडीने दखल घेऊन न्याय्य निर्णय द्यावा, अशी मागणी होत आहे.