हिमाचलमध्ये दुर्दैवी अपघातात जळगावच्या सौ. लक्ष्मी विराणी यांचे निधन.
मार्मिक न्यूज नेटवर्क जळगाव : हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात घडलेल्या भीषण अपघातात जळगावच्या सौ. लक्ष्मी विराणी यांचे अकाली निधन झाले. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून घसरलेले प्रचंड दगड एका खासगी बसवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सौ. विराणी यांचा मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, आज सकाळी शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कार्यस्थळी सहकारी श्री. तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात देण्यात येईल व पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल.या दुर्घटनेनंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी त्वरित संपर्क साधून आवश्यक ती मदत व समन्वय साधला. सौ. लक्ष्मी विराणी यांच्या निधनाने जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि दुःखाच्या या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य मिळो, हीच प्रार्थना सर्वत्र व्यक्त होत आहे.