मा. आमदार बच्चूभाऊ कडू साथी गुलाबराव पाटील पुरोगामी राजकीय पुरस्काराने सन्मानित..
अमळनेर : विक्की जाधव.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात माजी आमदार बच्चू कडू यांना साथी गुलाबराव पाटील पुरोगामी राजकीय पुरस्काराने तर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ऍड. अशोक बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायावर तीव्र शब्दांत टीका केली. “शेतकऱ्यांच्या आंदोलना पेक्षा गावात गणपती बसवायला जास्त लोक एकत्र येतात, एवढी उदासीनता समाजात निर्माण झाली आहे. मत चोरीपेक्षा समाजमन चोरीला गेलं आहे,” असे त्यांनी नमूद केले. जातपात, धर्म, पंथ आणि अंधनिष्ठावंत राजकारणामुळे शेतकऱ्यांची लढाई मोठी होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

तर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी देशातील विदारक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना “पूर्वी मतदार सरकार निवडायचे, आता सरकारच मतदार निवडते,” अशी मिश्किल टिपणी केली. तर अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुधीर तांबे यांनी तरुणांना जातीय द्वेषाला बळी न पडता लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी, पालक, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.