पारधी समाज सभागृह झाले निष्कृष्ट बांधकामाचे बळी – ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी..
अमळनेर : विक्की जाधव.
नगर परिषदेने ठराव क्रमांक ८४१, दिनांक २२ सप्टेंबर २०२० नुसार २३ लाख ८४ हजार ४४० रुपयांचा खर्च करून उभारलेले पारधी समाजाचे सभागृह आज अक्षरशः उद्ध्वस्त अवस्थेत उभे आहे. एवढा प्रचंड खर्च करूनही सभागृहात उभे राहणे देखील मुश्कील झाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात नगर परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे.


सभागृहाचा उपयोग वाढदिवस, सामूहिक कार्यक्रम तसेच मुलांच्या अभ्यासवर्गांसाठी होतो. मात्र या ठिकाणी गळती, भेगा आणि अकार्यक्षम व्यवस्थेमुळे सामान्य कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाचे पैसे पाण्यात घालून समाजाच्या मूलभूत सोयींचा बळी दिला जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, त्याचे सर्व डिपॉझिट जप्त करावे आणि भविष्यात कोणतेही शासकीय काम देऊ नये, अशी जोरदार मागणी होत आहे. त्याचबरोबर गळती थांबवून सभागृहाची तातडीने दुरुस्ती करून द्यावी.