पातोंडा व नांद्री गावात पुराचा फटका – प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने पीडितांना दिलासा
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांमध्ये अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. बाधित कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, पातोंडा येथील जिल्हा परिषद शाळेत व नांद्री गावातील स्थानिक भवनात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.पूरग्रस्तांना खिचडी व चहा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच बिछायतची सोय प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने केली गेली. सध्या पूरस्थिती नियंत्रणात आली असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने पातोंडा व नांद्रीतील ग्रामस्थांना तात्पुरते स्थलांतरित ठिकाणीच थांबण्याचे आवाहन केले आहे.


ही संपूर्ण मदत मोहीम प्रांताधिकारी नितीकुमार मुंडावरे व तहसीलदार रूपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल सहाय्यक अनिल चौधरी व प्रदीप महाले तसेच तलाठी पवनकुमार शिंगारे (पातोंडा) आणि किरण महाजन (नांद्री) यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. पूरामुळे स्थानिक शेतकरी व रहिवाशांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रांताधिकारी साहेबांनी तातडीने पंचनामा करून मदत कार्यवाही वेगाने पार पाडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे संकटातही दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
