७ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे – वाळकी येथील ५८ वर्षीय आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा..
अमळनेर/चोपडा : विक्की जाधव.
अल्पवयीन ७ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी वाळकी (ता. चोपडा) येथील अशोक देवराम पाटील (वय ५८) यास चोपडा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने चार वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीवर पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ तसेच भा.दं.वि. कलम ३५४, ३५४(अ) इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल होता.
घटनेत, उसतोडीच्या हंगामात पिडीतेचे आई-वडील शेतावर गेलेले असताना आरोपीने गोड बोलून मुलीला घरात नेले व तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील चाळे केले. पिडीता रडत बाहेर पळाली व बहिणीमार्फत आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली.
सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. फिर्यादी, पिडीता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या साक्षांवर विश्वास ठेवत न्यायालयाने आरोपीस पोक्सो कलम ८ अंतर्गत ३ वर्षे कैद व २ हजार रुपये दंड (न भरल्यास २ महिने अतिरिक्त कैद) आणि कलम १२ अंतर्गत १ वर्ष कैद व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या कारवाईत पैरवी अधिकारी पीएसआय उदयसिंग साळुंके, पो. कॉ. राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पो. हे. कॉ. पुरुषोत्तम वाल्डे (अमळनेर), पो. हे. कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर) आणि इतर पोलिसांचे सहकार्य लाभले.