अमळनेरमध्ये डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ : दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची भीती
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील विविध भागांत डेंगू व इतर साथीच्या आजारांचे रुग्ण समोर येत असून, साफसफाई, फवारणी आणि स्वच्छ पाणीपुरवठा या बाबींमध्ये अमळनेर नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा दूषित व दुर्गंधीयुक्त होत असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. अशा दूषित पाण्यामुळेच विविध आजारांना खतपाणी मिळत असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे.

नगरपालिकेने फक्त नावापुरती फवारणी व सफाई मोहीम हाती घेतली असून, प्रत्यक्षात जागोजागी साचलेले पाणी, उघडे गटार व कचऱ्याचे ढिगारे यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे डेंगू, टायफॉइड व मलेरियासारख्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून ठोस उपाययोजना अपेक्षित असताना, त्यांची भूमिका निरुत्साही व उदासीन असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

शहरात साथीचे रोग बळावत असताना, स्वच्छता निरीक्षक व पाण्याच्या टाक्यांची तपासणी करणारे कर्मचारी यांच्यावर मोठी जबाबदारी असली तरी कार्यवाहीचा अभाव दिसून येत नाही.

नागरिकांच्या समस्या गंभीर असून त्यावर तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा रोगांचा प्रादुर्भाव अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.