दूषित पाणी पाजून अमळनेरकरांच्या जीवाशी खेळ! प्रशासनाचा निर्लज्ज कारभार
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणारा प्रकार सध्या अमळनेरमध्ये सुरू असून, अनेक भागात गडूळ, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्याला घातक पाण्याचा पुरवठा सातत्याने होत आहे. १०-१० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, तोही अशुद्ध आणि दूषित स्वरूपात, ही अमळनेरकरांची भीषण वास्तवस्थिती आहे.
पालिकेचे कर्मचारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असून, पाणीपुरवठा विभाग निष्क्रिय झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाणी टाक्यांच्या परिसरात नाल्याचे साचलेले पाणी व दुर्गंधी यामुळे संपूर्ण परिसरात संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर आणि पाणीपुरवठा अभियंते प्रवीणकुमार बैसाणे यांचं प्रशासनावर कोणतंच नियंत्रण राहिलेलं नाही. नागरिकांकडून तक्रारी गेल्यानंतर “बघतो”, “सांगतो”, “फोन करतो”, “होईल” अशा ढिसाळ आणि टाळाटाळ करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या जातत. कोणताही ठोस उपाय अथवा कारवाई होत नसल्यामुळे लोकांचा संताप उफाळून आला आहे.

शहरात सध्या पाण्यासाठी ताटकळत असलेल्या नागरिकांना नुसती प्रतीक्षा नव्हे, तर आरोग्याच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं आहे. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.