अमळनेरचा रेशन घोटाळा! बनावट संस्था, खोट्या नावांवर परवाने अन प्रशासनाचे धक्कादायक खुलासे
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर तालुक्यात बनावट संस्था आणि खोट्या सदस्यांच्या आधारे रेशन दुकानांचे परवाने मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारावर आता जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, अमळनेर शिवसेना (शिंदे) तालुका प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत ठोस पुरावे सादर करत कारवाईची मागणी केली आहे. अमळनेर तालुक्यातील रेशन सम्राट असलेल्या महेंद्र बोरसे यांच्याकडे दहा ते बारा रेशनिंग चे दुकान आले कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे यासंदर्भात दोन दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द झाले असून इतरही दुकाने पुढे रद्द होतील आणि आम्हाला न्याय मिळेल असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा थेट आदेशही दिला.!
११ जुलै २०२५ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. रुपेश विजय बिजेवार यांनी निर्मलाई फाउंडेशन (मुडी) या संस्थेला स्पष्ट आदेश दिला की: “राशन दुकान चालवण्यासाठी लागणारे अधिकृत प्राधिकारपत्र, दुकानदाराचे नाव किंवा इतर संबंधित पुरावे ३० दिवसांच्या आत सादर करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल.” यानंतर हे आदेश पारित झाले आहेत.
शिवसेनेचे सुरेश पाटील यांचा गंभीर आरोप “फसवणूक झाली, कारवाई झाली पाहिजे” शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी निवेदनातून सांगितले की: २०१८ पासून संबंधित संस्था सेशनिंगमाल उठवत होती, पण प्रत्येक वर्षी गडबड, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे प्रकार समोर येत होते. शासनाने आधीच रद्द केलेल्या निर्मलाई फाउंडेशन व छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय मंडळ या संस्थांनी नवीन नावं, खोट्या सदस्यांची माहिती, बनावट प्रतिज्ञापत्रं सादर करून परवाने मिळवले. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे अनेकदा वापरणे, बनावट पत्ते आणि खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली.एकाच व्यक्तीच्या नावे वेगवेगळी नावं दाखवून वेगवेगळ्या दुकानांवर परवाने मिळवले, असून रद्द केलेल्या संस्थांचे नाव बदलून किंवा नवीन सदस्य दाखवून ‘नवे दुकान असल्याचा’ बनाव केला आहे.
निर्मलाई फाउंडेशनची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न
या प्रकरणावर निर्मलाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा महेंद्र बोरसे यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या संस्थेचे या घडलेल्या प्रकाराबाबत मत काय आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.
बनावट सदस्य, खोट्या कागदपत्रे व गैरव्यवहार झालेल्या मालावर प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे.