अमळनेरमध्ये रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई; टवाळखोरांना समज देऊन सोडले
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अमळनेर पोलिसांनी शाळा-महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत काल 7 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालय परिसरात कोणताही शैक्षणिक उद्देश नसताना फिरणाऱ्या सात युवकांना पोलीस गस्त पथकाने ताब्यात घेतले. त्यांना योग्य ती कायदेशीर समज देऊन सोडण्यात आले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी माहिती देताना सांगितले की, “शैक्षणिक परिसरात विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर पुढील काळात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा व्यक्ती आढळल्यास तात्काळ अमळनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.”

सदर कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. ही मोहीम पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अमोल पाटील, प्रशांत पाटील, गणेश पाटील, नितीन कापडणे व जितेंद्र निकुंभे यांनी पार पाडली. शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे माहिती आहे.