या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराचे बाप कोण?
ज्याला आमदार वा लोकप्रतिनिधी म्हणावे अशी ज्याची लायकी नाही त्या शिंदे गटाच्या मुजोर आमदाराने आज आपली औकात दाखवून दिली. आमदार निवास आकाशवाणी येथील उपहारगृहातून या महोदयांनी जी डाळ मागवली होती ती शिळी होती या एका कारणावरून या मस्तवाल गावागुंडासमान संजय गायकवाड याने निष्पाप कॅन्टीन कर्मचाऱ्यांस चापटी व ठोश्याने बेदम मारहाण केली.
या गावगुण्ड प्रवृत्तीच्या आमदाराचे वर्तन पाहून राग अनावर होतो. हा गावठी माणूस आमदार असूनही अक्षरशः टॉवेल व बनियन अश्या अर्धनग्न अवस्थेत आमदार निवसातून कॅन्टीनमध्ये येतो. आपण आमदार आहोत, याचे भान विसरून राहत्या घरातही कोणी सभ्य माणूस वावरत नाही, तश्या टॉवेल गुंडाळलेल्या व बनियन वर हा माणूस आमदारांच्या कॅन्टीनमध्ये येतो व एखाद्या बॉक्सर प्रमाणे निरपराध कॅन्टीन कर्मचाऱ्याला ठोसा लगावतो व सहा चापटी लागवतो, हा बिहार उ. प्र. लाही लाजवणारा लांच्छनास्पद प्रकार प्रसार माध्यमातून संपूर्ण जगाने पाहिला. हा आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा नसता तरच नवल. भाजपाचा आशीर्वाद व EVM ची कृपा यामुळे पाशवी बहुमत लाभल्याने भाजपा व शिंदे सेनेस माज आला आहे. मराठीची गळचेपी करून हिंदी सक्ती करणाऱ्या भाजपावर दोन्ही GR मागे घेण्याची नामुष्की येऊनही अक्कल आली नाही. विरारच्या मोर्च्याला परवानगी नाकारण्याचा करंटेपणा अंगलट येताच, दोन तासात परवानगी द्यावी लागली, ती जनरेट्यामुळेच. पुण्यात “जय गुजरातची” घोषणा देऊन एकनाथ शिंदेनी पूरती फटफजेती करून घेतली. हे प्रकरण ताजेच असताना या गावगुण्ड वृत्तीच्या संजय गायकवाड याने आपली औकात दाखवून दिली. डाळ शिळी असेल तर त्यात त्या कर्मचाऱ्याचा काय दोष ? कॅन्टीनचे ठेकेदार कोण आहेत, गेली पाच वर्षे अनेक तक्रारी असतानाही तोच कॉन्ट्रॅक्टर कोणाचा लाडका भाऊ आहे ? या कॅन्टीनवर नियंत्रण करणारी समिती गेली पाच वर्षे का डोळेझाक करीत होती.
आज हा विषय सभागृहात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिताफिने चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात ढकलून दिला. एकनाथ शिंदे यांनी अश्या नालायक आमदाराची हकालपट्टी करण्याऐवजी समज देऊन -मलमपट्टी करून वेळ मारून नेली. महाराष्ट्रात कायदा व सुव्यस्थेची YZ झाली आहे.गुंडाना पोलिसांची भीती राहिलेली नाही. आत्ता तर सत्ताधारी पक्षाचे आमदारच बनीयन टॉवेल वर आमदार कॅन्टीन मध्ये निरापराध कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करीत आहे.
आत्ता विधानसभा अध्यक्ष या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला निलंबित करतात कि नाही, यावरून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नावापुरती तरी शिल्लक राहते कि नाही हे सिद्ध होईल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०