जातीचा रेकॉर्ड दुरुस्ती नाकारण्याबाबत शिक्षणाधिकारी धुळे यांच्यावर उच्च न्यायालयाची नामुष्की – आदेश परत घेण्यास दोन आठवड्यांची मुदत
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
धुळे जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांवर शाळेच्या रेकॉर्डमध्ये जातीच्या दुरुस्तीला नकार दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, डोंगर नवसारे यांनी त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर चुकीचा जातीय उल्लेख झाल्यामुळे रेकॉर्ड दुरुस्तीसाठी संबंधित शाळेत अर्ज केला होता. मात्र, नवसारे यांनी शाळा सोडलेली असल्याचे कारण देत शिक्षणाधिकारी, धुळे यांनी त्यांच्या अर्जास नकार दिला होता. डोंगर नवसारे यांनी हा नकार उच्च न्यायालयात आव्हान दिला. यावर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरसुद्धा चुकीची नोंद सुधारता येते. त्यामुळे नवसारे यांचा अर्ज निकाली काढण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
तरीसुद्धा शिक्षणाधिकारी धुळे यांनी आदेश न पाळता पुन्हा नवसारे यांचा अर्ज फेटाळला. यामुळे नवसारे यांनी अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दोन आठवड्यांत सुधारित आदेश देण्याची अंतिम संधी दिली आहे, अन्यथा प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित वकिलांनी आदेश मागे घेण्याची तयारी दर्शवली असून नवीन आदेश योग्य कारणांसह दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
या प्रकरणात अवमान याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. निलेश भागवत यांनी बाजू मांडली, तर संकेत कुंजीर यांनी सहकार्य केले. आता शिक्षणाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.