अपनी भाषा में पढ़े! Translate

कल खेलमे हम हो ना हो…..

मी दिलीप मालवणकर. गेल्या ५२ वर्षांपासून शिव सैनिक म्हणून सक्रिय. परंतु स्थानिक गटबाजी व खेकडा प्रवृत्तीमुळे सक्रिय सहभाग नसला तरी पत्रकारिता व लेखनद्वारे पक्षाची पाठराखण करीत आहे. शिव सेनेतील फूटी नंतर गद्दारांविरोधात विपुल जहाल व सडेतोड लेखन करीत आहे.

मी १९८४ पासून समाज सेवेला वाहून घेतले आहे. अस्मिता ट्रस्ट च्या माध्यमातून असंख्य उपक्रम राबविले. शालांत व्याख्यानमालेचे १९८३ ते २००७ दरम्यान २५ वर्षे सातत्याने आयोजन केलं. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्याचे वाटप, नाट्य, कला, संगीत, नृत्य, क्रीडा व साहित्यिक उपक्रम तर इतके राबवले की सविस्तर सांगणे शक्य नाही.

पत्रकार म्हणून मी १९८१ पासून २०१२ दरम्यान वृत्त पत्रात पत्रकारिता केली. दैनिक नवशक्ती, दैनिक सामना, दैनिक सन्मित्र, दैनिक जनमत, दैनिक सांजवात, दैनिक युवा वार्ता दैनिक श्रमिक एकजूट, जनादेश आदी दैनिकात पत्रकारिता केली. विपुल लेखन केलं. २०१२ पासून मुक्त पत्रकार म्हणून समाज माध्यमाद्वारे सक्रिय आहे.

मी CHM महाविद्यालयात असताना प्रथमच पाथेय या भित्ती पत्रकाचे १९७५-७६ साली संपादन केले. हीच माझ्या पत्रकारितेची सुरुवात. नंतर १९८१ पासून मी दैनिक नवशक्ती मध्ये पत्रकारिता करू लागलो. २०१२ पर्यंत नवशक्तीचा प्रतिनिधी (३२ वर्षे) होतो. २०१२ साली दैनिक नवशक्ती मध्ये रुजू झालेल्या संपादकाने मला पेड मुलाखती आणण्याचा आग्रह केला. मी सांगितले की मी पत्रकार आहे. तुमचा जाहिरात प्रतिनिधी नाही! मला पेड मुलाखती घेणे जमणार नाही! असे ठणकावून सांगून नवशक्ती चा निरोप घेतला. १९८९ साली दैनिक सामना सुरु झाला. पहिले संपादक अशोक पडबिद्री यांनी सामना सुरु होण्या आधीच माझी प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. मला पूर्ण वेळ वार्ताहर म्हणूनही नियुक्ती मिळाली असती. परंतू मी सार्वजनिक बांधकाम विभागातील (महाराष्ट्र शासनाची) कायम नोकरीचा राजीनामा देऊन नुकताच बाहेर पडलो होतो. तेथे मी स्टेनोग्राफर पदावर होतो. त्यामुळे सामनाची अत्यल्प वेतनाची नोकरी करणे संयुक्तिक नव्हते. त्यामुळे मी उल्हासनगर प्रतिनिधी म्हणून सामनात काम पाहू लागलो. दरम्यान १९८७ साली मी माझा “हेमांगी प्रिंटर्स” हा छपाईचा व्यवसाय करून स्वयं रोजगार निर्माण करून ८ लोकांना रोजगार मिळवून दिला.

सर्व सुरळीत सुरुवात होते. दरम्यान मी शिव सैनिक असल्याने व नंतर नगरसेवक म्हणूनही निवडून आल्याने स्थानिक शहर प्रमुख बोडारे व दिवंगत उपशहर प्रमुखाने मला सामनातून काढण्याचा प्रयत्न सुरु केला होताच. १९९४ दरम्यान संजय राऊत हे दैनिक सामनाचे संपादक झाले. त्याच वेळी बाळासाहेबांचा जयंती विशेषांक निघणार होता. त्यावेळी शिवसेनेत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पप्पू कलानीस शह देण्यासाठी उल्हासनगरचा डॉन गोपाळ राजवानी यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. भिवंडीचे सुरेश वैतीही त्या प्रवेशावेळी मातोश्रीवर होते. प्रवेशाच्या वेळी औपचारिकता म्हणून बाळासाहेबांच्या सोबत गोपाळ राजवानी, दिघे साहेब व सुरेश वैती यांचा एकत्र फोटो काढला होता.

मी सामनात बातम्या देण्यासाठी जात असल्याने गोपाळ राजवानी याने मला विनंती केली की माझी एक जाहिरात सामनाच्या विशेषांकात द्या. त्या करिता गोपाळ राजवानीने उपरोक्त फोटो व जाहिरात मूल्य ५ हजार माझ्याकडे दिले. ते मी सामनाच्या जाहिरात विभागात जसेच्या तसे नेऊन दिले. मी काही जाहिरात प्रतिनिधी नव्हतो किंवा या जाहिरातीचे कमिशनही मी घेतले नव्हते.

सदर जाहिरात २३ जानेवारीच्या विशेषांकात प्रकाशित होताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकच काहूर माजवले. “मालवणकरांनी एका गुंडासोबत बाळासाहेबांचा फोटो छापून बाळासाहेबांची बदनामी केली!” असे आकांड तांडव केलं. वास्तविक ती बातमी नव्हती तर सामनाने पैसे घेऊन छापलेली जाहिरात होती. आणि जाहिरातीत जो फोटो प्रकाशीत झाला होता तो अस्सल होता. तरी त्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या कडे केलेल्या तक्रारी वरून संजय राऊत यांनी कोणतीही शहनिशा न करता वा माझी बाजूला ऐकून न घेता मला “उद्यापासून बातमी पाठवू नका” असे तोंडी सांगितले. ते सामनात नवखे असल्याने हुकूमाचे ताबेदार होते. वास्तविक त्यावेळी सामना अत्यल्प मानधन देत असे. परंतू पक्षाचा पेपर म्हणून मी सामनाचे काम पाहत होतो. अश्या प्रकारे संजय राऊत यांनी एका निष्ठावंत पत्रकाराचा बळी घेतला. माझ्याकडे नवशक्ती दैनिक होतेच शिवाय मी दैनिक सन्मित्र चे काम पाहतच होतो. सकाळ मध्येही माझे लेख प्रकाशित होत होते. तसेच “श्री” सारख्या नामांकित साप्ताहिकात माझे लेख “खास बात” या सदरात प्रकाशित होत. लोकसत्ता मध्ये माझ्या बाल कथा प्रकाशित होत. आकाशवाणीवरही काव्य वाचनाचे कार्यक्रम युवावाणीत होत.

शिवाय माझे स्वतःचे “अजब लोकशक्ति” हे साप्ताहिक होते. ज्याचा मी संपादक प्रकाशक व सर्वेसर्वा होतो. त्यामुळे सामना मुळे मला फरक पडला नाही. परंतू सामनाचे संपादक संजय राऊत यानी माझ्यावर अन्याय केला हे मी आजपर्यंत विसरलेलो नाही.

मी १९९२ व नंतर १९९५ च्या पोट निवडणुकीत शिवसेना नगरसेवक म्हणून निवडून आलो. एक वर्ष मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले व माझा ठसा उमटवला. १९९७ च्या निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधकांनी दगाबाजी केल्याने मला अवघ्या २५ मतांनी पराभव पत्करावा लागला. माझी ९२ मतं आमच्याच लोकांनी जाणीवपूर्वक बाद केली होती.या विषयी अनेकदा सविस्तर लिहिले आहे. त्याची पुनरावृत्ती मी करू इच्छित नाही.

समाज सेवा, राजकारण, पत्रकारिता करीत असताना मी साहित्य क्षेत्रातही लक्षणीय योगदान दिले. अनेकांची पुस्तकं माझ्या छापखान्यात प्रकशित केली. माझा पहिला प्रतिनिधिक कविता संग्रह कवडसे हा १९८० साली प्रकाशित केला. त्यानंतर २०११ पासून आजतगायत माझे अनुक्रमे १.आपलं उल्हासनगर,२. मालवणी मसाला,३. हार प्रहार, ४.गद्दारांना क्षमा नाही, ५.उल्हास दर्पण, ६.अष्टपैलू व्यक्तिमत्व (संपादित ) असे ५ लेख संग्रह तसेच १.प्रभंजन,२.बाप माझा सांगून गेला तसेच ३.राजकारणाच्या प्रदेशात असे ३ कविता संग्रह मिळून ८ संग्रह व एक प्रतिनिधिक संग्रह कवडसे असे ९ संग्रह प्रकाशित झाले आहेत.

या शिवाय माझे साप्ताहिक अजब लोकशक्ती चे २५ वर्षे संपादन व प्रकाशन केलं. त्यानेही जनमानसात ठसा उमटावला होता.२५ वर्षे अजब लोकशक्ती दीपावली विशेषांक प्रकाशित केले.

मी माझ्या हयातीत अनेक यशस्वी आंदोलने केली. त्यात मैदान बचाव आंदोलन (१९८५) B.Ed.महाविद्यालया विरोधातील आंदोलन (१९८७) मच्छी मार्केट साठी केलेले आंदोलन (१९९६)
बोगस जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे विरोधात ५ वर्षे सातत्याने केलेले आंदोलन व त्याची झालेली बडतर्फी, अशी अनेक आंदोलने केली. महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून ती रोखली. त्यात चिक्की घोटाळा,डस्टबिन घोटाळा, फूटबॉल स्पर्धा घोटाळा, VTC मैदान नूतनीकरण घोटाळा. महिला व बालकल्याण विभागातील घोटाळा, मतदार जागृती निविदेतील घोटाळा, अवैध भरती घोटाळा उघडकीस आणून महिला बोगस सफाई कामगारास बडतर्फ करायला लावणे अशी अनेक प्रकरणे आहेत.

मी १९८७ साली कायम स्वरूपी सरकारी नोकरी सोडून हे उपदव्याप केले. सडेतोड लेखन करणारा पत्रकार हीच माझी खरी ओळख आहे. मी तोच माझा फार मोठा सन्मान मानतो. जाता जाता – माझ्या १० गाण्याचा अल्बम गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्याने मी गीतकारही झालो.

माझ्या या संघर्षमय वाटचालीचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या नंतर माझा हा इतिहास कोणी लक्षात ठेवो न ठेवो. “कल खेल में हम हो ना हो” माझी पुस्तकं आणि संघर्ष लोकांच्या संग्रही राहावा म्हणून हा लेखन प्रपंच. अधिक काय लिहू.

दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
९ जून २०२५

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!