अमळनेरमध्ये थरार! गावठी पिस्तूलसह १९ वर्षीय तरुण अटकेट
अमळनेर : शहरात बेकायदेशीर शस्त्रसाठ्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पैलाड येथील शिवाजीनगरमधील १९ वर्षीय चेतन उर्फ सत्तू धोबी याला २०,५०० रुपयांचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अमळनेर पोलिसांनी अटक केली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संकुल परिसरात करण्यात आली. गोपनीय माहितीवरून ही कारवाई करताना पो.उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, विनोद संदानशिव आणि सिद्धांत शिसोदे यांनी संयुक्तपणे सापळा रचला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास क्रीडा संकुलाच्या भिंतीआड संशयित तरुण पिस्तूलसह लपून बसल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. पोलिसांचे पथक पाहून आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र काही अंतरावरच त्याला पकडण्यात आले. त्याच्या अंगझडतीत सिंगल बोअर पिस्तूल व एक जिवंत काडतूस सापडले.
गुन्हा दाखल:
पोलिसांनी ताबडतोब शस्त्र अधिनियम कलम ३, ५ आणि मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास पो.उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.