अमळनेरचे पत्रकार पांडुरंग पाटील यांना ‘भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार’ जाहीर
अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा मानाचा पुरस्कार अमळनेरच्या झोळीत
अमळनेर : विक्की जाधव.
पत्रकारितेतील आपल्या प्रामाणिक योगदानासाठी अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा “भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या त्रैमासिक सभेत करण्यात आली.
पत्रकार पांडुरंग पाटील यांनी गेली अनेक वर्षे ग्रामीण प्रश्न, सामाजिक न्याय, शैक्षणिक मुद्दे आणि प्रशासनातील अनियमितता यावर ठामपणे लेखणी चालवत जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या निःपक्ष आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेमुळे त्यांना जिल्हा व राज्यपातळीवर नेहमीच आदराने पाहिले जाते.
हा पुरस्कार म्हणजे अमळनेर सारख्या ग्रामीण भागातील पत्रकारितेची दखल राज्यपातळीवर घेतल्याचा ठोस पुरावा आहे. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम यांचा समावेश असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत हा गौरव सोहळा होणार आहे.
या पुरस्काराबद्दल पांडुरंग पाटील यांचे अमळनेर शहर आणि तालुका पत्रकार संघटनांकडून, सहकाऱ्यांकडून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.