अमळनेर यात्रा उत्सवात चोरटे, दारुडे आणि दरोडेखोरांचा सुळसुळाट; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह..
अमळनेर : विक्की जाधव.
श्रद्धेचा उत्सव असावा की भीतीचा अनुभव? संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाच्या दरम्यान, एकीकडे भक्तीचा महोत्सव मोठ्या उत्साहात रंग घेत असताना, दुसरीकडे चोरटे, दारुडे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांनी यात्रेच्या पवित्र परिसरावर गंडांतर आणलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून यात्रा क्षेत्रात रात्रीच्या वेळी चोरट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच एका कापड दुकानदारावर लुटीचा प्रयत्न झाला असून, कालच एका नशेधुंद व्यक्तीने दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकारांमुळे यात्रेतील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यात्रेच्या गजबजाटात गुंड प्रवृत्तीचे लोक हुशारीने मिसळत असून, दुकानांपासून लेकरांच्या खेळण्यांच्या गाड्यांपर्यंत कोणतीही वस्तू सुरक्षित राहिलेली नाही. यात्रेकरूंच्या पावलोपावली असुरक्षिततेची जाणीव होत आहे. “पोलीस प्रशासन केवळ वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीच आहे की नागरिकांच्या सुरक्षेसाठीही?” असा सवाल आता सर्वसामान्यांच्या ओठांवर आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “उत्सव साजरा होणं आनंददायी असावं, भयावह नव्हे,” अशी भावना आता उमटू लागली आहे.
संत सखाराम महाराजांच्या यात्रेची शान आणि श्रद्धा टिकवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा अमळनेरकरांकडून व्यक्त केली जात आहे.