विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी: मंदिर विकासकामांना वेग
मार्मिक न्यूज नेटवर्क :
पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी केली. त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “मंदिरात सुरू असलेली कामे समाधानकारक असून, अधिकाधिक कामे आषाढी एकादशीनंतर पूर्ण होतील.”
मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि सुव्यवस्थेसाठी कॉरिडोरचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी काही जमिनी आणि प्रॉपर्टीज अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. मात्र, त्यासाठी संबंधितांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता योग्य मोबदला देण्यात येईल.
दुकानदारांसाठी विशेष सवलती
मंदिर परिसरातील दुकानदारांबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. “ज्यांची दुकाने आहेत, त्यांना पर्यायी दुकाने मिळतील किंवा त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भक्तांसाठी अधिक सुविधा
या विकासकामांमुळे भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित होईल, अशी अपेक्षा आहे.
यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लवकरच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.