करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- महाशिवरात्री निमित्ताने करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथे आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. सकाळी सहा पर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले असून संगोबा येथील आदिनाथ महाराज हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सिना नदीच्या काठावर हे मंदिर असून भव्यदिव्य चिरेबंदी बांधकामातील सुबक असे मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांना महाशिवरात्री निमीत्त येण्यासाठी करमाळा एस टी महामंडळाच्या वतीने यात्रा स्पेशल गाड्यांची सोय करण्यात येते. तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त देखील ठेवण्यात येतो. सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यातील लाखो भाविक या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येत असतात.