भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल द्वारे ३१ वे मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीर
(निलेश गायकवाड)
भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३१ वे मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीर” दिनांक २ ते ४ जानेवारी २०२५ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित केले आहे असे डॉ पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था व मुनोत ट्रस्ट चे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी सांगितले आहे.
पद्मश्री डॉ. शरदकुमार दिक्षित, विश्वविख्यात प्लॉस्टिक सर्जन यांनी मागील तीन दशकांपेक्षा अधिक काळ भारतातील विविध शहरात अशा शिबिराचे आयोजन केले होते. अमेरिकेत वास्तव्य असूनही त्यांनी भारतातील हजारो लोकांवर प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण केले. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील शिष्य प्रसिध्द प्लॉस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टीन (अमेरिका) यांनी गेली १४ वर्षापासून पुढे चालू ठेवला आहे. या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, फुगलेले गाल, चिकटलेली बोटे अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत, असे शिबीर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी सांगितले
आहे.
हे शिबीर जरी तीन दिवस चालणार असले तरी रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त गुरुवार, दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी या एकाच दिवशी सकाळी ९.०० ते १२.०० पर्यंत होणार असून उर्वरित वेळी शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. शिबिरा विषयी अधिक माहितीसाठी श्री विजय पारख ९८२२४२४३१६, श्री नितिन शहा ९६०४९१३२९६ यांच्याशी सम्पर्क साधावा असे आवाहन बीजेएसचे, पुणे ग्रामीण अध्यक्ष सचिन बोगावत यांनी केले आहे.