करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूका दोन ते तीन महिन्यांवर येवून ठेपल्या असून संपूर्ण महाराष्ट्रात पक्षीय व गटातटाच्या राजकारणात मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. त्याअनुषंगाने करमाळा विधानसभेमध्ये सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संभाव्य उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून लोकसभेच्या निवडणूकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने व त्यानंतर दुसऱ्या संभाव्य उमेदवार रश्मी बागल कोलते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेची हक्काच्या जागेला उमेदवार नसल्याच्या चर्चा ठिकठिकाणी पहायला मिळत होत्या.
परंतु शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या सक्रिय सहभागामुळे करमाळा मतदार संघाकरिता नवखे व उमदे नेतृत्व विधानसभेसाठी उभे केले जाणार असल्याची माहिती युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी गायकवाड म्हणाले की, करमाळा विधानसभेकरिता शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही, शिवसेना ही जागा भाजपला सोडेल अन्यथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडेल अशा पध्दतीच्या खोटया वावडया विरोधकांकडून उठवल्या जात आहेत. परंतु यामध्ये तथ्य नसून करमाळा विधानसभेची निवडणूक ही शिवसेना संपूर्ण ताकतीनिशी लढवणार आहे. याकरिता प्रा.शिवाजी सावंत यांची करमाळा मतदार संघात चाचपणी सुरू असून उच्चशिक्षीत व जनतेशी सलोखा ठेवणारे नेतृत्व आम्ही या निवडणूकीत उतरवणार आहोत तसेच लवकरच शेकडो नागरिकांचा शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहितीही यावेळी गायकवाड यांनी दिली.