मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा
मुंबई : (विशेष प्रतिनिधी – वर्षा चव्हाण )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना असून महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेच्या मार्फत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात जुलै २०२४ पासून होणार असून दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात दिली. आज दि.२८ जून २०२४ रोजी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ते अर्थसंकल्प सादरीकरणात बोलत होते. मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना दीड हजार दिले जाणार आहेत. २१ ते ६० वयोगटातील महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही योजना गरीब महिलांसाठी असणार आहे. पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होऊ शकतो. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये प्रति माह दिले जातील. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसेच त्यांचे वर्षाला उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असावे, अशी अट आहे.