नेपाळ येथील परिषदेत श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे नाव गाजले.
रविता कुंभार
दोंडाईचा शहर वार्ताहर
दोंडाईचा :- दिनांक ६ व ७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान नेपाळ एक्वाकल्चर सोसायटी (नास), झूलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (झेडएसआय), वुमेन इन सायन्स अँड ह्युमॅनिटी (विश) यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल आनन्द पशुपती येथे सायन्स, सोसायटी व कल्चर या विषयावर आधरीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नेपाळ, बांगलादेश, थायलंड, चीन, भूतान, अमेरिका व भारताच्या विविध राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातुन आलेले १३६ प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांनी सदर परिषदेत सहभाग नोंदवून आपले संशोधन प्रस्तुत केले व आधुनिक विज्ञानाचा वापर समाजाचा विविधांगी विकास करण्यासाठी चर्चा केली.
सदर परिषदेच्या उदघाटन नेपाळ सरकार मधील आरोग्यमंत्री मोहन बहादूर बसनेत यांच्या हस्ते त्रिभुवन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा भक्त माथेमा, नास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा परिषदेचे मुख्य संचालक प्रा शाम नारायण लाभ, झेडएसआयचे अध्यक्ष प्रा बी एन पांडे, विश या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा बबिता लाभ कायस्था, झुलॉजीकल सोसायटी ऑफ बांगलादेशच्या अध्यक्षा हमीदा खानून यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उदघाटन प्रसंगी आरोग्यमंत्र्यांनी ग्लोबल वार्मिंग व क्लायमेट चेंज यापासून सृष्टीचे तथा पर्यावरण व जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करणेसाठी संशोधकांनी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे विषद केले.
परिषदेच्या उदघाटना नंतर आमंत्रित साधनव्यक्ती म्हणून धुळ्याच्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे श्रीमती पा.बा. महाविद्यालय, दोंडाईचा येथे प्राणिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ३४ वर्ष सेवा बजावल्यानंतर प्राचार्य म्हणून नियुक्त झालेले डॉ प्रकाश एस लोहार यांनी “रोगांची तीव्रता व उपचार पद्धतीत जैविक संपदेचा वापर” या तांत्रिक सत्रात कर्करोगाचे प्रकार, वाढते प्रमाण, तसेच प्रयोगशाळेत सस्तन प्राण्यांमधील रासायनिक ड्रगचा वापर करून उत्पन्न केलेल्या यकृताच्या कर्करोगाच्या गाठीत असलेल्या पेशीतील व रक्तात प्रवाहित आनुवंशिक घटकाचे (डीएनए) वाढलेले प्रमाण व अशा प्राण्यांवर सलासीया ओब्लाँगा (सप्तरंगी) या वनस्पतीच्या अर्काचा वापर करून यकृतातील कर्करोगाच्या गाठींचे प्रमाण कमी होण्यास मदत होते या संदर्भातील महत्वपूर्ण संशोधनाचे सादरीकरण केले. यानंतर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिल्याने प्राचार्य डॉ लोहार यांच्या संशोधनाची सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊन परिषदेचे संचालक व तांत्रिक सत्राचे अध्यक्ष यांनी प्रशंसा केली तसेच समारोपतील भाषणात उभायतांनी प्राचार्य डॉ लोहार यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले व उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. सदर परिषदेतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रा डॉ लोहार यांचे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल रोहिदास पाटील, उपाध्यक्ष डॉ संजय पाटील, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर पाटील, दोंडाईचा महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख, सचिव अमित पाटील, सदस्य डॉ रवींद्र देशमुख, सौ जुई अमित पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
परिषदेत अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील व धुळे येथील स्कॉलर्स पॉईंटचे संचालक तथा संशोधक विद्यार्थी संजय कदम यांनी जैवविविधतेचे रक्षण या विषयी शोधनिंबध सादर करून यशस्वीपणे सहभाग नोंदविला.