मदनवाडी येथील कारंडे बंधूंनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकावले प्रथम व द्वितीय क्रमांक
(निलेश गायकवाड )
आपल्या मुला-मुलींनी डॉक्टर, इंजिनीअर किंवा सरकारी अधिकारी बनून नाव कमवावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकाच घरातील सख्या चुलत भावांनी चक्क कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत कुस्तीचे धडे घेत जिल्ह्यात नाव कमवत आपल्या बापाची कॉलर ताईट केली आहे.
क्रीडा व युवक संचनालय तसेच पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील कारंडे कुटुंबातील दोन्ही बंधूंनी पुणे जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवला.
ऋतुराज संपत कारंडे यांनी 51 किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक व पृथ्वीराज शिवाजी कारंडे यांनी 17 वर्षे वयोगटात 60 किलो वजनी गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही बंधूंच्या झालेल्या कामगिरीमुळे मदनवाडी ग्रामस्थांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.