मोफत बसेसने पापक्षालन होणार नाही !
काल पुण्याहून परतताना मुख्यमंत्री व त्यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांचे फोटो स्टिकर एसटी बसेसवर लावलेल्या असंख्य बसेस दिसल्या. कोकणवासीयांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने गणेशोत्सवा निमित्त मोफत बस सेवा,असे ठळक अक्षरात लिहिले होते. गणेशोत्सव हा चाकरमानी कोंकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा व श्रद्धेचा विषय असतो. लाख संकटं आली तरी कोकणी माणूस शिमगा, गावची जत्रा व गणेशोत्सव चुकवत नाही. वर्षभर कडी कुलुप बंद असलेली घरं चकाचक होऊन झळाळून जातात.
कोंकणवासीयांच्या याच श्रद्धेस कॅश करून मोफत बसेसची कल्पना खासदार व अर्थात मुख्यमंत्र्यांच्या सुपीक डोक्यात शिरली असावी. मोफत बस, चहा, नाष्टा व पाकिट दिले की लोकं मेंढरासारखी मागे येतात, हा अनुभव डुप्लिकेट दसरा मेळाव्यात आलाच होता. त्यावेळी एसटी महामंडळास १० कोटी रोख रक्कम कोणी व कुठून दिली, याचा जवाब गुलदस्त्यात असतानाच कोंकणवासीयांसाठी ९८ बसेससाठी पैसा कोणी लावला ? हा प्रश्न डोकं वर काढत आहे. मुख्यमंत्रीपुत्र “खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने” या बसेस आहेत, याचा अर्थ या खर्चाचे उत्तरदायित्व डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावरच येते. ४० हजार कोकणवासीयांचा निव्वळ एसटी तिकिटाचा खर्च प्रत्येकी ६०० रूपये जरी धरला तरी तो ४०,००० × ६०० = २,४०,००,००० २ कोटी ४० लाख इतका होतो. शिवाय चहा नाष्टा व जेवण खर्च केला असल्यास तो वेगळा. इतका अफाट खर्च कोंकणवासीयांवर करण्याची गरज खासदार व त्यांचे पिता शिंदे यांना का वाटली ? आगामी निवडणुकीत मतांची बेगमी मिळवण्यासाठी कोंकणवासीयांना दिलेली ही लाच आहे ! असे आम्ही का समजू नये ?
कोकणी माणूस हा पुर्वीपासून बाळासाहेब ठाकरे यांना व त्यांनी जन्मास घातलेल्या शिवसेनेस मानणारा आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी केलेल्या गद्दारीस कोंकणी स्वाभिमानी जनता कधीच माफ करणार नाही. यासाठीच त्यांच्या भावनांना हात घालून त्यांना रिझविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ४० हजार कोंकणी कुटुंबं आपल्याकडे वळतील वा आपल्यावर भाळतील ही मिंधे गटाची अंधश्रद्धा आहे. या ×× ××× हा खर्च का केला ? हे न ओळखण्या एवढा तो दुधखुळा वाटतो का ?
हेच कोंकणवासीय देवाक गा-हाना घालतील, *”देवा महाराजा ही इडापीडा नष्ट कर, या गद्दारांक पायदळी तुडव महाराजा, आमच्या उद्धव सायबांचा उद्धार कर महाराजा, २०२४ च्या निवडणुकीत उद्धव सायबांक विजयी कर महाराजा ! यामोफत बससेवेचो हिसाब माग रे महाराजा ! पुढच्या वर्षाक आमी आमच्या पैश्याने ह्यो नवस फेडूक येतलो महाराजा !”*
कोकणी माणूस मिंधा नाही, पैश्यांना भुलणारा तर अजिबात नाही. मोफत बस मिळाली म्हणून त्या बदल्यात मतं देईल, ही मिंधेंची अंधश्रद्धा आहे.
आजच बातमी वाचली की, ठाण्यात विसर्जन घाट व दशक्रिया घाटाचे लोकार्पण गद्दार आमदार प्रतापी सरनाईक याने केले. हा एक शुभसंकेतच आहे. गणपतीच्या आगमना पुर्वी उद्या सर्वोच्च न्यायालयात पक्ष व पक्ष चिन्हाबाबत सुनावणी आहे. याचाच अर्थ गणेश उत्सवातच मिंधे गटाचे विसर्जन होऊ शकते. मग त्यासाठी हा विसर्जन घाट कामी येईल. तसेच मिंधे सेनेचे दशक्रिया विधीही ठाण्यातच करण्याची सोय नियतीने करून ठेवली आहे.
यालाच आम्ही म्हणतो- देवाक काळजी !
दिलीप मालवणकर
कट्टर मिंधे विरोधक
९८२२९०२४७०
१७ सप्टेंबर २०२३