शिक्षण उपसंचालकांच्या पत्राला केराची टोपली.
22 सप्टेंबर २३ रोजी शिक्षण संचालनालयावर धडकणार भव्य मोर्चा!
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – पुरोगामी महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी चक्क शिक्षण उपसंचालकाच्या पत्राला केराची टोपली दाखवली असे मत गौतम कांबळे यांनी व्यक्त केले असून महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर होणारी अन्यायाची मालिका सातत्याने सुरूच आहे . याबाबत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शालेय शिक्षण मंत्री माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे .नुकतेच एका शिपायानी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली घटना ताजी असतानाच पुणे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचा मजूरपणा वाढलेला आहे .
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील एका संस्थेतील शिक्षकांची सेवा जेष्ठता ठरवण्याचे प्रकरण गेली दीड-दोन वर्षापासून माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांच्याकडे प्रलंबित आहे .या संस्थेत फक्त सहा शिक्षक कार्यरत आहेत .सहा शिक्षकांची सेवा जेष्ठता ठरवण्यासाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी गेलेला आहे परंतु सेवा जेष्ठता होत नाही व तेथील मागासवर्गीय शिक्षकाला आर्थिक व मानसिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे . याबाबत शिक्षण उपसंचालकांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्या असता वाखारे यांना लेखी पत्र शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी पाठवले .परंतु राज्याश्रयाच्या बळावर कामकाज करणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना काहीही फरक पडला नाही व त्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या पत्राला केराची टोपली दाखवली . ही बाब गंभीर असून पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही .याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांच्याकडे संघटनेने तक्रार दाखल केली आहे .माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे .आता शिक्षण संचालक कोणती भूमिका घेतात याकडे पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे .22 सप्टेंबर २३ रोजी शिक्षण संचालनालय यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.