कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी.
प्रतिनिधी भगवान लोंढे ..
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथे दिनांक 20/07/2023 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय मनोहर चौधरी साहेब, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी कें गोळे कला फॅकल्टी चे प्रमुख प्रा. भिमाजी भोर, क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ.भारत भुजबळ आणि कार्यालय प्रमुख श्री अभिमन्यू भंडलकर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तानाजी कसबे यांनी केले. तर प्रमुख वक्त्या मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे ह्या होत्या.
डॉ.लामतुरे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या अलौकिक कार्याविषयीची माहिती दिली. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या “लौकिक अर्थाने कोणत्याही प्रकारची पदवी नसलेल्या अण्णाभाऊ साठेंनी किंवा कधीही शाळेची पायरी चढले नाहीत अशा अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मूल्य प्रस्थापित करण्याचे कार्य आपल्या साहित्याच्या माध्यमातून व कार्यातून केले. दुष्काळी भाग असलेल्या मान आटपाडी तालुक्यातील ते मूळचे. नंतर ते मुंबईला गेले. तेथे त्यांनी बहुजन समाजाचे दुःख, वेदना, व्यथा पाहिल्या. त्यांचे गुलामगिरी सारखे जीवन पाहिले. कामगार वर्गाची व्यथा पाहिली आणि तेथून पुढे त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला.आपल्या साहित्यातून त्यांनी कामगार वर्गाच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनाची दिशा पालटली. शाहीर अमर शेख यांच्या मदतीने त्यांनी अनेक पोवाड्यांची रचना केली व ते सादर केले. आंबेडकरी जलसे सादर केले . फकीरा, माकडीचा माळ, चित्रा यासारख्या कादंबऱ्यांचे मराठी साहित्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. जवळपास 40 कथा, कादंबऱ्यांची रचना अण्णाभाऊ साठे यांनी केली. अलौकिक अशा प्रतिभेचा हा कवी शाहीर आणि लेखक होता .
या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय मनोहर चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉ. भरत भुजबळ यांनी मानले.
या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.