करमाळा प्रतिनिधी – प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत पुणे (सदाशिव पेठ) येथील पुजा अविनाश राऊत हिने पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली असून नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर परिसरात गुलाल उधळून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी, आई व वडील दोघेही पारंपरिक घरगुती इस्त्री हा व्यवसाय करीत मुलीला उच्च शिक्षण देत होते. आजही आई कोळशाची इस्त्री करीत असताना निकाल जाहीर झाला व आपली मुलगी पोलीस उपनिरीक्षक झाली हा आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला झाला व त्यांनी आनंदाआश्रूना वाट मोकळी करून दिली. आई वडिलांचे कष्ट पाहून मुलीनेही (पूजा राऊत) त्यांच्या कष्टाचे फळ हे जिद्दीने अभ्यास करून फेडले असल्याची भावना यावेळी सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. अनेक स्तरातील मान्यवरांनी राऊत हिचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
याबाबत आम्ही पूजा राऊत हिच्याशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, आई वडिलांनी खुप कष्टाने पै पै जमवून माझे शिक्षण पूर्ण केले. माझ्या प्रत्येक निर्णयात त्यांनी माझी खंबीरपणे साथ दिली. माझ्यावर विश्वास ठेवून व स्वतः च्या ईच्छा आकांक्षा बाजूला सारून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी आजवर मोठा त्याग केला. दिवसभर कोळशाची इस्त्री करून कमवलेला पैसा हा माझ्या MPSC च्या शिक्षणासाठी खर्च केला. त्यांचे कष्ट मी व्यर्थ जाऊ देणार नाही अशी खूणगाठ उराशी बाळगूनच मी अभ्यास करीत असत. जीवनात अनेक चढ उतार आले, कधी काळी पुस्तके, ग्राउंड साठी लागणारे बुट, ड्रेस इ. खर्चिक व महागडे साहित्य सुद्धा त्यांनी कशाचीही तमा न बाळगता मला घेऊन दिले पण तू पाहिलेले पोलीस उपनिरीक्षक पदाचे स्वप्न पूर्ण कर, जे काही लागेल ते ते घे पण पाहिलेले स्वप्न अर्धवट सोडू नको. हे वाक्य माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला यशाच्या शिखराकडे घेऊन गेले. अभ्यास करताना ज्या ज्यावेळी अभ्यासात मन लागत नसे त्या त्या वेळी आई वडिलांचे कोळशाच्या इस्त्री समोरचे दृष्य अचानक डोळ्यासमोर उभे राही व माझ्या मनाला जाणीव करून देई की, ध्येयपूर्ती होई पर्यंत थांबायचं नाही तेव्हा तेव्हा मी कित्येक पटीने मनानेच अभ्यासाला लागायचे असाही अनुभव यावेळी राऊत हिने सांगितला.
यावेळी राऊत हिने तिला MPSC मध्ये लाभलेल्या मार्गदर्शक गुरूंचे, मित्रांचे, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आभार मानले.