तांदुळवाडी जि. प. शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
प्रतिनिधी / अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तांदुळवाडी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नेहमी आग्रह धरणार्या तांदुळवाडी जि. प. आदर्श शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा केला. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट, मा. सरपंच राजाभाऊ शिंदे, ग्रा. पं. सदस्य अजिनाथ कनिचे व उपस्थिती सर्व मान्यवरांच्या हस्ते करुन या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी सात वेगवेगळे टेबल लावण्यात आले होते. यामध्ये नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणन पूर्वतयारी आणि मार्गदर्शन व समुपदेशन असे वेगवेगळे सात टेबल लावण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे आनंददायी आणि कृतीयुक्त तसेच खेळातून शिक्षण देत शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, शाळेविषयी भीती मनातून नाहीशी व्हावी, यासाठी मोठ्या उत्साहाने प्रयत्न करण्यात आले. या मेळाव्यामध्ये महिला वर्ग, पालक वर्ग तसेच गावातील युवा वर्ग यांनी विशेष सहभाग नोंदवला. बालकांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मनसोक्त आनंद लुटला. शाळा पूर्वतयारी पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना आपण कसे शिक्षण प्रवाहात आणू शकतो. तसेच त्यांच्या मनातून शिक्षणाविषयी भीती कशी घालू शकतो. याबाबत शाळेतील शिक्षक कुंभार सर यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी मा. सरपंच राजाभाऊ शिंदे यांनी या मेळाव्यामध्ये उत्साहाने सहभाग घेत उपस्थित्यांना प्रोत्साहन दिले. तसेच राक्षे मॅडम यांनीही पालकांना मार्गदर्शन केले. नियोजनबध्द व यशस्वीरीत्या शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल ग्रा. पं. सदस्य अजिनाथ कनिचे, शा. व्य. स. चे उपाध्यक्ष राधा माने तसेच ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांचे विषेश कौतुक केले. मेळाव्याचे सुत्रसंचालन कदम सर यांनी केले.