मदनवाडी येथील शिव फाउंडेशनच्या वतीने प्राण्यांसाठी पाण्यांची व्यवस्था
(निलेश गायकवाड )
मदनवाडी(ता.इंदापूर) येथील शिव फाउंडेशन च्या वतीने अकोले भादलवाडी(ता.इंदापुर) येथील पाणवठ्यावर हरिण,ससे,कोल्हे, लांडगे आदी वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शिव फाउंडेशनच्या पुढाकाराने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे प्राणी प्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील अकोले व भादलवाडी येथील वनक्षेत्रामध्ये असलेल्या कृत्रिम पाणवट्यांमध्ये मदनवाडी येथील शिव फाउंडेशन च्या वतीने पाणी सोडण्यात आले. यावेळी बिल्ट कंपनीचे व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे , शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, उपाध्यक्ष किरण रायसोनी, निखिल बोगावत, धनेंद्र गांधी, रमेश आहेर, वनरक्षक सनी कांबळे, अक्षय खोमणे, संतोष लोंढे, अरविंद देवकाते, आकाश वनवे,दिनेश मारणे,अक्षय बंडगर उपस्थित होते.
पाण्यासाठी भटकंती करत असताना वन्य प्राण्यांना अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताला सामोरे जावे लागत होते. शिव फाउंडेशन च्या वतीने अकोले, भादलवाडी, पोंधवडी येथील वनक्षेत्रामधील कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात आले. पाणवठ्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे वन क्षेत्रातील प्राण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत बोलताना शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर म्हणाले, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील अकोले, भादलवाडी, पोंधवडी येथील प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. पाण्यासाठी भटकंती करताना प्राण्यांचे अपघातही होत होते.ही बाब विचारात घेऊन शिव फाउंडेशनच्या वतीने अकोले, पोंधवडी व भादलवाडी येथील कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार हे कृत्रिम पाणवठे भरून प्राण्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाचे संयोजन शिव फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले.