‘जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान’
व महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यात आज डागा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘जागरूक पालक सुदृढ बालक अभियान’ व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पहिल्याच दिवशी शहरी व ग्रामीण भाग मिळून 93 मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि 452 नागरिकांनी रक्तदान केले. तर आरोग्य तपासणी अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा, अंध व दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृहे, बाल सुधारगृहे, अनाथालय समाज कल्याण व आदिवासी विभाग वसतीगृह, खाजगी नर्सरी, बालवाड्या, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळाबाह्य शून्य ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुला- मुलींची आरोग्य तपासणी ‘जागरूक पालक सुदृढ बालक अभियान’ अंतर्गत करण्यात येत आहे. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज रक्तदान शिबिर व जागरूक पालक सुदृढ बालक अभियानाची आरोग्य केंद्रांना भेट देत पाहणी केली. तर डागा स्त्री रुग्णालय येथील अभियानाच्या उदघाटनप्रसंगी आ. विकास कुंभारे यांची उपस्थिती होती.
अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.