June 30, 2025 2:13 pm

तुमचं बापाचं काळीज तुटलं
पण तुम्ही तर बापालाच लुटलं !

अपनी भाषा में पढ़े! Translate

तुमचं बापाचं काळीज तुटलं
पण तुम्ही तर बापालाच लुटलं !

(दिलीप मालवणकर यांच्या लेखणीतून )

(खास लोकाग्रहास्तव लिहिलेला लेख)

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचं भावनाप्रधान व पिता प्रेमाने ओतप्रत भरलेले पत्र वाचलं. ह्रदय भरून आलं,आणि एका पित्याचं हळवं मन पहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या ओघात एकनाथ शिंदेंच्या नातवाबद्धल भावी नगरसेवक असा उल्लेख केला. मात्र श्रीकांत शिंदेंनी त्याबद्दल ज्या हळव्या भावना व्यक्त केल्या त्याचा आदर केला गेला पाहिजे, असे माझे त्यांच्याशी कितीही मतभेद असले तरी प्रामाणिक मत आहे.मी त्याच्या पितृत्वाचा व पुत्र प्रेमाचा आदर करतो.

आजचे राजकारण हे इतके खालच्या पातळीवर गेले आहे की ते पाताळात देखील पोहचले आहे. राजकारणातला विरोध हा राजकीय मुद्यांपुरता व राजकीय व सामाजिक मुद्यांपुरता असला पाहिजे,या बद्दल कोणाही सुज्ञ माणसाचे दुमत असणार नाही.परंतू सद्या या मर्यादा ओलांडल्या जात आहेत, हेही तितकेच खरे आहे. राणे पिता पुत्र तर इतरांची लायकी व औकात काढण्यातच धन्यता मानत असतात. मिंधे गटाचे आमदार व स्वयंघोषित नेते तर सर्वच मानमर्यादा ओलांडत आहेत.ज्यांनी आयुष्यभर तिकिट व पदांसाठी मातोश्रीच्या पाय-या झिजवल्या इमानाच्या आणाभाका घेऊन शिवबंधन बांधुन घेतले ते आज राहत्या घराचे वासे मोजत आहेत. खाल्लेल्या अन्नाशी बेईमानी करीत आहेत. ज्या धनुष्यबाण या निशाणीवर ते निवडून‌ आले,ज्या शिवसेनेच्या AB फॉर्मवर त्यांना शिवसेना सचिवांनी उमेदवारी बहाल केली,त्या शिवसेना रूपी बापाशी गद्दारी करताना, त्याचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न करताना,त्याही पुढे जाऊन पंचावन्न वर्षाची परंपरा असलेल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी ते मैदान मिळू नये यासाठी किती आपटली! शेवटी न्यायालयाने न्याय निवाडा केला आणि त्यांचेच दात त्यांच्या घश्यात घातले,पण या कालावधीत बाळासाहेबांच्या मुलाच्या जीवाची किती घालमेल झाली असेल,त्यावेळी ही संवेदनशीलता कुठे गेली होती,शिंदे पुत्र खासदारजी ?

हे पण राहू द्या आपल्या पिताजींनी पळवून नेलेले 40 आमदार व तुमच्यासह 12 खासदार कट कारस्थान करून सुरत,गुवाहत्तीत पळून जाऊन भाजपा या महाशक्ति च्या प्रेरणेने बाळासाहेबांच्या पुत्राच्या पाठीत खंजीर खुपसला,तेंव्हा त्या दिवंगत पित्याला किती यातना झाल्या असतील, त्यांच्या आजारी असलेल्या पुत्राने हा घाव कसा झेलला असेल ? याची एक पिता व पुत्र या दोन्ही भूमिकेत शिरून कल्पना करा !

कोणाच्याही खाजगी गोष्टी बोलू नये व घरापर्यंत जाऊ नये हे सभ्य राजकारण्याचे व माणसाचे लक्षण आहे.या निकषावर आपल्या पिताश्रींचे सोबती किती खालच्या थराला जाऊन टीका करीत आहेत ! मॉसाहेबांबद्धल आक्षेपार्ह विधान करणा-या त्या फालतू आमदाराला आपण दोघांनी रोखल्याचे ऐकिवात नाही. दिवंगत बाळासाहेब व दिघे साहेबांबद्धल किती वादग्रस्त विधानं करणं सुरू आहे,दिघे साहेबांचे त्या चित्रपटात किती विकृत चित्रिकरण करण्यात आले आहे,ती बोगस शिष्य पौर्णिमा व खांद्यावरून दिघे साहेबांचा मृतदेह आणण्याचा तद्दन खोटा सीन ज्याच्या एडिटिंग च्या वेळी आपण स्वतः डोळ्यात तेल घालून पाहत होता,त्यावेळी हा खोटारडा प्रकार मी खपवून घेणार नाही,असे तुमच्या संवेदनशील (?) मनाला कसे वाटले नाही ?

आपण आपल्या कोवळ्या पुत्राबद्धल ज्या भावना व्यक्त केल्यात त्याचा मी पुन्हा आदर करतो. पण मला सांगा,किती लोकांना धमकाऊन, कारवाई करू, एनकाउंटर करू, एमआर टिपी लावू,बांधकामं तोडू, तडिपार करू, केसेस बाहेर काढू, हे सर्व लांच्छनास्पद प्रकार गेले तीन चार महिने सुरू होते तेंव्हा ती देखील माणसं आहेत,कोणाचा तरी पुत्र,पिता,पती वा मुलगा आहे,याची जाणीव तुमच्यातील संवेदनशील मनाला का झाली नाही ?

बरं ते ही राहू द्या,तुम्ही ठाकरे कुटुंबात विषाची पेरणी करून त्यांचे कुटुंबिय तोडले, तो निहार ठाकरे असेल,स्मिता ठाकरे असतील किंवा जयदेव ठाकरे असतील,त्यांना कुटुंबापासून तोडताना व आपल्या व्यासपीठावर मिरवताना तुम्हा पिता पुत्राला किती आनंद होत होता ? त्यावेळी, आपण घरगुती मतभेदाचा राजकिय लाभ घेत आहोत,याचे जरासेही वैषम्य वाटले नाही ? आणि म्हणे मी संवेदनशील ! इतकेच नाही तर तुम्ही घरातले नोकर चाकरही फोडण्यात धन्यता मानली ! हे कितपत माणुसकीला धरून आहे ?

शिवसेनेशी गद्दारी करून आपण दोघं भाजपाच्या गोठ्यात शिरलात, काय काय कारणं दिली गद्दारीच्या समर्थनासाठी ! त्यातले एक तरी खरे होते का ? इडिची पिडा टाळण्यासाठी तुम्ही दोघं भाजपाच्या वाशिंग मशीन मध्ये गेला असतात तरी काही वाटले नसते.पण तुम्ही तर पक्ष फोडायला निघालात,तुम्ही सेना भवन वर कब्जा करण्याचे मनसुबे जाहिर केले,तुम्ही मातोश्रीवर हक्क सांगू पहात होतात,तुम्ही भगवा चोरला,तुम्ही धनुष्यबाण चोरी करू पाहत आहात, तुम्ही शिवसेनेवर हक्क सांगत आहात,तुम्ही बाळासाहेबांवर हक्क सांगत आहात !

अरे बाप बेट्यांनो तुमचे स्वतः चे म्हणून आहे तरी काय ? हे एकदा तरी सांगा ! आत्ता म्हणता, आनंद आश्रम आमचा शाखा आमच्या, अजून काय काय हवे तुम्हाला ? एकवेळ बकासूराची भुक क्षमेल पण तुमची क्षमणार नाही. तुम्ही रावणाची वृत्ती घेतली,दहा तोंडांनी दहा प्रकारे बोलता,तुम्हाला काय उपमा द्यावी तेच कळत नाही.

बीकेसी वरील लिखित भाषणात काही दम होता का ? लिखित मजकूर तोही दुस-याने लिहून दिलेला वाचून दाखवणे याला भाषण म्हणत नाही,हे एक संसदपटू म्हणून आपण आपल्या पिताश्रींना सांगायला हवे होते. ना जनतेशी सुसंवाद, ना जनतेच्या ह्रदयाला स्पर्श करणारी भाषा,ना भाषण कौशल्य, तेही पैसे जेवण नाश्ता व मुंबई दर्शन चे आमिष दाखवून आणलेली नुसती गर्दीसमोर ? लोक डुलक्या खात होते,”निसटावंत” लोक चालू भाषण सोडून निसटत होते. भाड्याने आणलेले लोक,कामगार,ज्यांना कुठे आलेत, कोणासाठी आलेत ? याची थांगपत्ता नाही,त्यांच्यात त्याकुठून येणार तो शिवतीर्थावरील निष्ठावंतांचा जोश व जल्लोष ? पैश्याने मानवी देह तात्पुरते जमवता येतात,ती आभासी गर्दी असते,त्यात दर्दी नसतात.याला जर तुम्ही यशस्वी मेळावा म्हणत असाल तर ते स्वप्न रंजन म्हणून ठिक आहे पण प्रसिद्धी माध्यमांनी तुमची पोलखोल करून नागडं सत्य जगासमोर मांडलं आहे.कधी तरी संवेदनशीलतेने व मनाचा हिय्या करून आत्मपरीक्षण करा.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा,निष्ठावंत शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त जल्लोशाचे, कानात प्राण आणून भाषण ऐकणे काय असते,शिवसैनिकांची निष्ठा याचा एकांतात विचार करा व आत्मपरीक्षण करा,तर तुम्हाला लक्षात येईल की आपला मार्ग विनाशाचा आहे,बाप म्हणून संवेदनशील होताना आपण पिता व पुत्र मिळून कोणाच्या तरी बापाला लुटत आहोत याचा विचार करा !

उगीच संवेदनशीलतेचा आव आणण्यापेक्षा खरोखर संवेदनशील व्हा ! भाजपा तुमचा उपयोग फक्त शिवसेना कमकुवत करण्यासाठी करीत आहे,त्यांचा उद्देश सफल होताच तुमची गत Use and Throw सारखी होणार आहे,हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

जाता जाता रूद्रांशला मनापासून आशीर्वाद व उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

दिलीप मालवणकर
9822902470

7/10/2022

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!