राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांमधली प्रवेश प्रक्रिया सुरु
(निलेश गायकवाड)
राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतनांमधली प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून या तंत्रनिकेतनांमधल्या विशेष तुकड्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असं आवाहन अल्पसंख्याक विकास विभागानं केलं आहे.या तंत्रनिकेतनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरता ७० टक्के म्हणजेच 1 हजार 155 जागा उपलब्ध असून विशेष तुकड्यांमध्ये मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत.
या तंत्रनिकेतनांमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंटींग टेक्नॉलॉजीसारख्या विविध कोर्सचं प्रशिक्षण उपलब्ध असून या प्रशिक्षणाचं वार्षिक शुल्क 7 हजार 750 रुपयांइतकं अत्यल्प आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची संधीही उपलब्ध असणार आहे. सदर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी 30 जून 2022 पर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे. या प्रवेशाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी https://poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसंच ०२२- ६८५९७४३०, 8698781669, 8698742360 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन या विभागानं केलं आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकड्या असलेल्या तंत्रनिकेतनांमध्ये राज्यातल्या हिंगोली, जालना, अंबड, लातूर, नांदेड, वांद्रे, रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी, जळगाव, पुणे, कराड , आणि सोलापूर अशा १४ शासकीय तंत्रनिकेतनांचा समावेश आहे.