“महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदासाठी आता नवा चेहरा हवा,जो संघटनेला यापुढील यशोशिखरावर घेऊन जाण्यास सक्षम असेल”- जय कवळी “
पुणे – महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव आदरणीय जय कवळी सर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला (तिसरा कार्यकाळ :२०१८ ते २०२२).२०१८ मध्ये कल्याण,ठाणे येथे पार पडलेल्या राज्यसंघटनेच्या चतुर्वार्षिक निवडणुकीत जय कवळी यांची अध्यक्षपदासाठी लागोपाठ तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली होती,२०१० पासून आतापर्यंत लागोपाठ तीन कार्यकाळात अध्यक्षपदाची धुरा अत्यंत यशस्वीरित्या सांभाळून एकूणच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेला विकासाची दिशा देत संपूर्ण महाराष्ट्रभर या ऑलिम्पिक बॉक्सिंग खेळाचं जाळे विणले.
मोठ्या ऊर्जेने,उत्कृष्ट अशा कार्यशैलीने,अत्यंत सुनियोजित असा कार्यक्रम आणि प्रचार व प्रसाराचे सुयोग्य असे माध्यम वापरत बॉक्सिंग खेळासाठी अहोरात्र काम करणाऱ्या बॉक्सिंग संघटकांना सोबत घेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग खेळ पोहचविण्यात जय कवळी यशस्वी ठरले आणि या यशस्वीतेला पुढे नेण्यासाठी आज नव्या अध्यक्षपदासाठी योग्य अशा सक्षम उमेदवारास महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना खुल्या दिलाने आमंत्रित करीत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बॉक्सिंग खेळ पोहचवताना राज्याच्या ग्रामीण भागातून राज्य,राष्ट्रीय,खेलो इंडिया व आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार करण्यात त्यांच्या कल्पक मार्गदर्शनाचा मोठा हातभार प्रशिक्षक, बॉक्सिंग संघटक व जिल्हा संघटना यांना राहिला,एकेकाळी मुख्यत्वे फक्त पुणे, मुंबई व थोड्याफार प्रमाणात नागपूर या शहरापुरता अधिकाधिक मर्यादित राहिलेला ‘बॉक्सिंग’ हा जागतिक स्तरावरील अत्यंत लोकप्रिय ऑलिम्पिक खेळ अध्यक्ष जय कवळी यांच्या नेतृत्वाखाली नुसताच चांद्यापासून बांद्यापर्यंतच पोहोचला नाही तर गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा,नंदुरबार, धुळे इत्यादी सारख्या दुर्गम जिल्ह्यातही बॉक्सिंग खेळाची केंद्रे बनली तसेच बॉक्सिंग परिवार राज्याच्या सर्वदूर भागांत पसरून क्रीडाप्रेमींची एक आगळीवेगळी अशी चळवळच बनून राहिली आहे,समाजात जिथं बॉक्सिंगच्या नावाला लोकं घाबरायची तिथं आज ठिकठिकाणी बॉक्सिंग परिवाराची छोटी मोठी कुटुंबे उभारण्यात जय कवळी याच्या लोकसहभागी नेतृत्वाचा सिंहाचा वाटा राहिला,प्रचारक, प्रशासक ते अध्यक्ष होण्याआधी खेळाडू राहिलेल्या जय कवळी यांनी स्वतः तळागाळातून पार आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचाधिकारी म्हणूनही काम केले व लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्व जगातून फक्त ३६ पंचाधिकार्यात निवड होवून या विषयातील एव्हरेस्टही सर केले,राज्य संघटनेत सहसचिव, सचिव व महासचिव – असे टप्पाटप्प्यावर कामही केलं आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची कार्यशैली समजून घेत भविष्यात बॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोणत्या दिशेने वाटचाल करावी लागेल, त्या दिशेने योग्य असे नियोजन करत बॉक्सिंग खेळाचं जाळे महाराष्ट्राच्या संपूर्ण भागांत, जिल्हा-जिल्ह्यात निर्माण केलं.
तांत्रिक व प्रशासकीय बाजू संभाळताना एक कल्पक बॉक्सिंग संघटक म्हणूनही फार मोठी कामगिरी त्यांनी केली आहे,महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेने त्यांचे बॉक्सिंग खेळासाठी योगदान व हाताळण्याची पद्धत पाहता भविष्यातील योग्य असा नेता म्हणून लोकांनी निवडला व त्या विश्वासाला पात्र ठरत राज्य संघटनेची धुरा २०१० पासून घेत ग्रामीण भागाच्या तळागाळापर्यंत बॉक्सिंग खेळ पोहचविण्यासाठी नियोजित अशी दूरदृष्टी ठेवली.कठिण परिस्थितीत शांतपणे समस्यांचे निराकारण करणारा तांत्रिक तसेच अनुभवी प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मर्दमराठ्याकडे आता तर देशभरातूनच नव्हे तर आशियाई व जागतिक स्तरावरही त्याच आशेने जय कवळी यांच्याकडे पाहिलं जातय. सोबतीला बॉक्सिंग खेळाने झपाटलेल्या संघटकांना सोबत घेत तसेच नवनवीन तरुण संघटक, प्रशासक,प्रचारक बनवत राज्यात सर्वदूर महाराष्ट्रीय बॉक्सिंगची एक नवी फळीच त्यांनी घडविली. २०१४ साली त्यांच्या कल्पक मेंदूतून साकार झालेल्या cccp : प्रशिक्षक प्रशिक्षण कर्यक्रमातून तसेच पंचाधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमातून आज राज्यभरांत ५०० हून अधिक नवे प्रशिक्षक व पंचाधिकारी घडले, हे बॉक्सिंग जगतातील एक आश्चर्यच समजले जाते.,१९२५ साली स्थापन झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी बॉक्सिंग या राज्याच्या संघटनेकडे कितीतरी दशके एकच बॉक्सिंग रिंग होती आज कवळी यांच्या राज्यव्यापी झंझावातानंतर आजपर्यंत ७० च्या आसपास बॉक्सिंग रिंग्ज संपुर्ण महाराष्ट्रात आहेत,प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व प्रत्येक छोट्यामोठ्या शहरांत बॉक्सिंग रिंगसह या खेळाचं एक चांगलं संघटन असावं ही दूरदृष्टी ठेवून,सक्रिय कार्यशैलीने राज्यातील सर्व भागांत नवनेतृत्व उभं करण्याचा महाकाय कार्यक्रम त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडला. गाव – तालुका – जिल्ह्यासाठी राज्यात सर्वदूर विविध उपक्रम, विविध कार्यशाळा : अशा भरगच्च अशा नियोजित कार्यामुळे राज्यात बॉक्सिंगसारखा रांगडा खेळ तळागाळापर्यंत पोहचला, हे कवळींच्या सातत्यपूर्ण अशा आग्रही हेक्यामुळेच !
जे चांगलं आहे त्याला मुक्त वाव परंतु जे पाठी राहिलेत त्यांना सोबत आणण्यासाठी खास प्रयत्न करत, रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारे सर्वसमावेशक असे न्याय्य प्रशासन, ही त्यांची कार्यशैली ! आणि त्यामुळेच त्यांचा ‘२७ काशिनाथ धुरु रोड दादर मुंबई २८’ हा पत्ता पार गडचिरोली सारख्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडू,प्रशिक्षक किंवा सामान्य कार्यकर्त्यास आपलासा वाटतो, ही त्यांच्या गेल्या या तीन दशकातील बॉक्सिंगच्या प्रशासनाची मिळकत . . .
असे हे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला आपलेसे वाटणारे अध्यक्ष तीन कार्यकाळ झाले म्हणून स्वतःहून बाजूस होणारे जय कवळी आमच्या सर्वांच्या हृदयात कायमचे अध्यक्ष म्हणूनच विराजमान असतील त्यांना महाराष्ट्र बॉक्सिंग परिवारातर्फे प्रेमपूर्वक मानाचा मुजरा !
- जितेंद्र तावडे (उपाध्यक्ष,माजी महासचिव २०१० – २०१५)
-भरतकुमार व्हावळ,उपाध्यक्ष माजी महासचिव २०१५ – २०१८ - राकेश तिवारी,महासचिव २०१८ – २०२२