महाराष्ट्र हे लोकशाहीचे सक्षम राज्य- हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त इंदापूर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की कल्याणकारी राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राने सहकारी, शैक्षणिक, औद्योगिक धोरणे राबवली. सामाजिक समतोल राखत सत्तेचे विकेंद्रीकरण करीत लोकशाहीचे सक्षम राज्य म्हणून गौरवशाली महाराष्ट्राने गेल्या 62 वर्षांत देशात सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्र असून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. औद्योगिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती महाराष्ट्राने साधली असून देशात महत्त्वाच्या सर्व क्षेत्रात गौरवशाली महाराष्ट्र आघाडीवर आहे.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वैयक्तिक पाठिंबा दिला होता. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान आहे.विविध क्षेत्राच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान मोठे आहे. कामगारांनी दिलेल्या योगदानामुळे आपली मोठी प्रगती झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य नागनाथ ढवळे, डॉ. शिवाजी वीर, डॉ. भिमाजी भोर, डॉ. सदाशिव उंबरदंड, डॉ. बाळासाहेब काळे, प्रा. बापू घोगरे उपस्थित होते.क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ यांनी आभार मानले.