मालेगावातील एकात्मता जॉगिंग ट्रॅकचा उद्घाटन आणि लोकर्पण सोहळा संपन्न
प्रतिनिधी-एकनाथ भामरे
मालेगाव इथल्या पोलीस कवायत मैदानातल्या एकात्मता जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन आणि लोकर्पण सोहळा कृषिमंत्री दादाजी भुसे आणि आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. या उद्घाटनप्रसंगी बोलताना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नागरिकांचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक एकात्मता जॉगिंग ट्रॅकमुळे मालेगावच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे.
कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मालेगावकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकात्मता जॉगिंग ट्रॅक हे एक महत्वाचे पाऊल आहे. या जाँगिंग ट्रॅकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठकव्यवस्था आणि इतर सुविधा मालेगावकरांना उपलब्ध होणार आहेत. तसंच येणाऱ्या काळात मालेगावकरांना अभिमान वाटेल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मालेगावच्या विकासात भर पडणार असल्याचेही भुसे यावेळी म्हणाले. पुढे बोलतांना कृषीमंत्री म्हणाले की, या जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून विविध खेळाडूंच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने कामे करण्यात येऊन प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, माझ्या खडतर कष्टाच्या व सरावाच्या बळावर आज मी आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावारुपास आले आहे. त्याप्रमाणे इतर खेळाडूंनीही प्रयत्न करुन आपल्या देशाचे नाव उज्वल करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मालेगावमध्ये अद्ययावत असं क्रीडा संकुल बांधण्यात यावं जेणेकरुन तालुक्यातल्या विविध खेळात पारंगत असलेल्या गरीब व होतकरु खेळाडूंना त्याचा निश्चितच लाभ होऊन मालेगावमधील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करतील. तसेच नाशिक धर्तीवर मालेगावमध्ये सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात यावा, अशी मागणीही यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.