रोटरी क्लब ऑफ भिगवण तर्फे दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात ‘व्यसनमुक्ती’ विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न…
व्यसन हे विनाशकारी वादळ आहे- डॉ.अमोल खानावरे
(निलेश गायकवाड)
रोटरी क्लब ऑफ भिगवण व दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय व्यसनमुक्ती कार्यशाळा आज दि. २५ मार्च २०२२ रोजी पार पडली. सदरच्या कार्यक्रमासाठी भिगवण येथील प्रसिद्ध डॉ.अमोल खानावरे व रोटरी क्लब ऑफ भिगवन चे अध्यक्ष श्री. संजय खाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ व संस्थेच्या सचिव माया झोळ मॅडम तसेच फार्मसी विभागाचे संचालक डॉ. अमोल कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हरेर, तसेच संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये तंबाखू, सिगरेट, गांजा, गुटखा यांचे दुष्परिणाम काय होतात या वर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.अमोल खानावरे यांनी मार्गदर्शनात म्हटले की, व्यसनांमुळे माणसास शारीरिक (Physical), मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट,अमली पदार्थांचे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते.
तंबाखूच्या सेवनाच्या चक्रव्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून निकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे काळाची गरज बनलेली आहे. तसेच या पासून तरूण पिढीला दूर कसे करता येईल ही या वर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.
सदरच्या कार्यशाळेचे नियोजन प्रा. राम निखाते आणि डॉ.सुदर्शन नागराळे यांच्याद्वारे करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सदरच्या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते.