प्रतिपंढरपूर असणार्या दौंड शहरात आषाढी वारीतील मानाच्या पालख्यांचे जल्लोषात स्वागत.
प्रतिनिधी : विकी ओहोळ
8446119158
दौंड – समस्त वारकरी संप्रदाय आजच्या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर असणार्या दौंड येथील विठ्ठलमंदिराकडे प्रस्थान करणार्या पंचक्रोशीतील मानाच्या पालख्यांचे दौंड शहरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात, जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवर पालख्यांचे,वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि विठ्ठलनामाच्या घोषाने संपूर्ण दौंड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
यावेळी मानाच्या पालख्यांचे स्वागत वीरधवल जगदाळे पाटील यांच्या हस्ते फुलांचा वर्षाव करून करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेशा पद्धतीने पालखीचे पूजन करून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेत भाविकांसाठी पिण्याचे थंड पाणी, सरबत, चहा, अल्पोपहार तसेच वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली होती. या सेवा उपक्रमामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
शहरातील नागरिकांनीही वारकऱ्यांचे मनापासून स्वागत करत विठ्ठलनामाचा गजर केला. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पालख्यांचा मुक्काम व पुढील प्रवास पार पडला. आषाढी वारीच्या निमित्ताने दौंड शहराने वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा आणि सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला. संपूर्ण शहरात भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.