“अमळनेरच्या राजकारणात आरोपांची रणधुमाळी; शिरीष चौधरींचा आमदार अनिल पाटील यांच्यावर गंभीर आरोपांचा भडिमार”
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले असून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अनिल पाटील यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले. विकासनिधीच्या मंजुरीपासून रेती उत्खनन, राजकीय दबाव, पोलीस प्रशासनाची भूमिका, खोटे गुन्हे आणि जातीय राजकारण अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांवर चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल केला. नऊ कोटीच्या शासकीय निधी अपहार प्रकरणी बोलताना चौधरी म्हणाले की “शासकीय निधी हा शासनाच्या अधिकृत प्रक्रियेतूनच मंजूर होतो. आमदार अनिल पाटील यांच्या बुद्धीची कीव येते असे म्हणत त्यांनी प्रत्यक्षात ज्या निधीबाबत दावे केले जात आहेत, तसा कोणताही निधी आलेलाच नाही,” अशी आमदार अनिल पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
पत्रकार परिषदेत चौधरी यांनी राजकीय दबावाचे आरोपही गंभीरपणे मांडले. एका विशिष्ट पक्षात प्रवेश करण्यासाठी स्वतःवर सातत्याने दबाव आणण्यात आल्याचा दावा करत त्यांनी घरावर झालेल्या हल्ल्याचा आणि त्यानंतर स्वतःवरच गुन्हे दाखल झाल्याचा उल्लेख केला. नंदुरबारसह विविध ठिकाणी धमकावून राजकीय दडपशाही करण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला तसेच इतर काही अधिकाऱ्यांच्या नावांचा संदर्भ दिला. पोलीस यंत्रणा निष्पक्षपणे काम करत आहे का, की राजकीय दबावाखाली निर्णय घेत आहे, असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रेती उत्खननाच्या मुद्द्यावर चौधरी यांनी अत्यंत गंभीर आरोप करत निवडणुकीच्या काळात निवडून आल्यानंतर रेतीवाले दोन नंबरचे धंदेवाले यांचे धंदे कायमचे बंद करणार असे म्हणणारे अनिल पाटील आधी डांबर चोरले आता रेती चोरत आहेत असाही त्यांनी आरोप केला. लाखो टन रेती खदानीत साठवून त्यावर कचरा टाकण्यात आल्याचा दावा ही त्यांनी फोटो सह सदर केला. संबंधित जागांना वैध खाणपट्टा मंजूर होता का, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीचा उल्लेख करत, शासकीय कर्मचारी उपस्थित असतानाही त्यांना संरक्षण मिळाले नाही आणि उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. “पोलीस प्रशासन नेमके कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
याशिवाय जातीय राजकारणाचा मुद्दा उपस्थित करत चौधरी यांनी आमदार अनिल पाटील यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केला. मराठा समाजातील युवकांवरील कारवाया, खोटे गुन्हे, सिंधी समाजातील तीन मुलांचा जीव गेलेल्या खदानीची घटना आणि त्या खदानीस खोदणारा जबाबदार कोण, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “ज्यांच्यावर यापूर्वी डांबर चोरी आणि नंतर रेती चोरीचे आरोप झाले, त्यांना इतरांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही,” असा टोला लगावत त्यांनी या सर्व प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
पत्रकार परिषदेच्या शेवटी चौधरी यांनी आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात असून या संपूर्ण प्रकरणी न्यायालयातही दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, “अनिल पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी गंभीर मागणी करत त्यांनी प्रशासनाने कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता सत्य जनतेसमोर आणावे, असे आवाहन केले.
दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले हे आरोप एकतर्फी असून त्यावर आमदार अनिल पाटील किंवा संबंधित पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.