सरडेवाडी हद्दीतील गोठ्यातून ८४ किलो वजनाच्या बोकडाची चोरी ; इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
सरडेवाडी (ता.इंदापूर) शिदवस्ती येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातून ५८ हजार रुपये किंमतीचे एक बोकड व एक शेळी ची चोरी झाली आहे. शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या शेळ्या व बोकडांची होत असणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
याबाबत फिर्याद अजय सुभाष शिद रा.सरडेवाडी ता.इंदापूर,जि.पुणे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून इंदापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वी.कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, इंदापूर पासून ३ किलोमीटर अंतरावर सरडेवाडी गावचे हद्दीत शिदवस्ती येथे रहिवाशी असून ते शेती करतात.घराच्या समोर शेळीपालनासाठी गोठा असून शिद यांच्या मालकीच्या १४ लहान मोठ्या शेळ्या व ७ लहान मोठी बोकडे होती.सोमवारी रात्री ८ च्या दरम्यान नेहमीप्रमाणे सर्व शेळ्यांना व बोकडांना चारा टाकून शीद कुटुंबासमवेत झोपी गेले.मंगळवारी सकाळी उठल्यानंतर सकाळी ६ वाजता गोठ्यात चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांना गोठ्याच्या कडेला लावलेली जाळी तोडलेली दिसून आली,शिवाय गोठ्यातील २ वर्षे वयाचे ८४ किलो वजनाचे अंदाजे ४० हजार रुपये किंमतीचे बिटल जातीचे बोकड व उस्मानाबादी जातीचे २ वर्ष वयाची अंदाजे १८ हजार रुपये किमतीची शेळी दिसून आली नाही. त्यानंतर शिद यांनी कुटुंबीयांसमवेत आसपासच्या परिसरात आपल्या शेळी व बोकडाचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.