आक्षेप डावलून निकाल जाहीर; शेतकरी संघ निवडणुकीत नवा वाद पेटला!
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत शेकडो बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप करत काही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. अंदाजे ७०० ते ८०० मतदारांच्या नावावर संशयास्पद मतदान झाल्याचा दावा करत चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर करू नये, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतरही तक्रारदारांनी उपस्थित केलेले प्रश्न कायम आहेत. मतदान केंद्रांवरील नोंदी, मतदार याद्या आणि कथित बोगस मतदानाची चौकशी होणार का? संबंधित अधिकाऱ्यांकडून या आरोपांची दखल घेतली जाणार का?

असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. निकाल लागला असला तरी वाद संपलेला नसून आता तक्रारदार पुढे न्यायालयीन लढाई लढतात की प्रशासन चौकशीचे आदेश देते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. “निकाल लागला, पण सत्य बाहेर येणार का?” हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.