महिन्याभरात दुसऱ्यांदा पाईपलाईन फुटली? अमळनेरचा पाणीपुरवठा पुन्हा कोलमडला!
पाणीचोरीवर कारवाईची गाजावाजा, पण खरे दोषी अजूनही मोकाट?
अमळनेर : विक्की जाधव.
जळोद-गांधली मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन अचानक फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले असले तरी गेल्या काही महिन्यात अनेकदा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आधीच पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मुख्याधिकारी यांनी पाणी चोरणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही अनधिकृत नळजोडण्या, बेकायदेशीर कनेक्शन आणि पाणीचोरीचे प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारांमुळे पाईपलाईनवर अतिरिक्त ताण येत असून वारंवार गळती आणि पाईप फुटण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे कारवाई केवळ काही मोजक्या लोकांपुरतीच मर्यादित राहिली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागातील काही भ्रष्ट आणि बेजबाबदार घटकांवर अंकुश ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीकाही होत आहे. जर पाणीचोरी रोखण्यासाठी आणि अनधिकृत जोडण्या बंद करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत असेल, तर वारंवार पाईपलाईन फुटण्याचे प्रकार का घडत आहेत? शहरातील हजारो नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या समस्येची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.