बारामती शहर पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन: “प्रत्येक गल्लीत कॅमेरा, प्रत्येक नागरिकाला सुरक्षा”
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती शहर व परिसरात वाहन चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी नागरिक, ग्रामपंचायती, गृहनिर्माण संस्था, हौसिंग सोसायट्या, व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक गल्लीत कॅमेरा आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षा” या संकल्पनेतून शहर व ग्रामीण भागात व्यापक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यावर भर देण्यात येत आहे.
माननीय अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीसांकडून शहरातील प्रमुख चौक, रस्ते, संवेदनशील ठिकाणे आणि प्रवेश मार्गांवर नियमित नाकाबंदी, वाहन तपासणी, रात्रीची गस्त, पेट्रोलिंग तसेच गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने राबविण्यात येत आहेत. मात्र, वाढत्या तांत्रिक आणि आधुनिक गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा ही काळाची गरज बनली असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
गुन्हेगारांचा बदलता पॅटर्न..
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या गुन्हेगार मुख्य रस्ते टाळून गल्ल्या, बोळ, वस्ती भाग आणि कमी वर्दळीच्या ठिकाणांचा वापर करून गुन्हे करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा चोरी किंवा चैन स्नॅचिंगसारखे गुन्हे करून काही मिनिटांत परिसर सोडून दिला जातो. अशा वेळी सीसीटीव्ही फुटेज हे आरोपींची ओळख पटविणे, त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पोलिसांच्या निरीक्षणानुसार, बारामती शहर आणि परिसरात वाहन चोरी, घरफोडी आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय असून त्या दिवसाही शहरात प्रवेश करून गुन्हे करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रभावी नियंत्रणासाठी सर्वसमावेशक सीसीटीव्ही नेटवर्क उभारणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गुणवडी गावाचा आदर्श..
या पार्श्वभूमीवर गुणवडी गावाने एक आदर्श निर्माण केला आहे. गावात अवघ्या काही दिवसांत संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गावातील प्रमुख रस्ते, चौक, प्रवेशद्वारे आणि महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविले जात असून त्यामुळे गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंध निर्माण होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून उभारल्या जाणाऱ्या या यंत्रणेमुळे भविष्यात गावात चोरी किंवा इतर गुन्हे करण्यापूर्वी गुन्हेगारांना अनेकदा विचार करावा लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शहरासह ग्रामीण भागातही गरज..
बारामती शहर पोलिसांनी मळद, पिंपळी, मेडद, डोरलेवाडी यांसह शहर परिसरातील सर्व गावांमध्ये आणि बारामती शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, प्रवेशद्वारे, नाके, गल्ल्या, बोळ, व्यापारी संकुले, हौसिंग सोसायट्या आणि निवासी भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे आवाहन केले आहे.
नागरिक, ग्रामपंचायती आणि व्यापाऱ्यांना आवाहन..
1. पोलिसांनी सर्व घटकांना पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे:
2. प्रत्येक घर, दुकान, कार्यालय आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
3. हौसिंग सोसायट्यांनी सामूहिक सुरक्षा यंत्रणा उभारावी.
4. ग्रामपंचायतींनी गावातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास प्राधान्य द्यावे.
5. व्यापारी संघटनांनी बाजारपेठा आणि व्यावसायिक संकुलांमध्ये कॅमेरे बसविण्यास पुढाकार घ्यावा.
6. नागरिकांनी सीसीटीव्ही बसविणे हा खर्च नसून कुटुंब, मालमत्ता आणि भविष्यातील सुरक्षेवरील गुंतवणूक असल्याचे लक्षात घ्यावे.
“सीसीटीव्ही प्रत्येक क्षणी पहारा देऊ शकतो”
बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, पोलीस प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षणी उपस्थित राहू शकत नाहीत, मात्र सीसीटीव्ही कॅमेरा २४ तास परिसरावर लक्ष ठेवू शकतो. नागरिकांचा सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळेच गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
संदेश –
“एक कॅमेरा बसवा… आपल्या कुटुंबाचा, व्यवसायाचा आणि शहराच्या सुरक्षेचा मजबूत पहारेकरी उभारा. आजचा निर्णय उद्याची सुरक्षित बारामती घडवेल.” अशी भावना बारामती शहर पोलिसांनी व्यक्त केली आहे.