इतर पक्षांना जे जमलं नाही ते करतंय आप तहसील-पंचायत समिती मागील दुर्गंधीचा प्रश्न तापला; आम आदमी पक्षाचा प्रशासनाला इशारा.
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. अनेक वर्षांपासून अस्वच्छता, सांडपाण्याची गळती आणि दुर्गंधीचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नाला आता आम आदमी पक्षाने वाचा फोडली असून तहसीलदार आणि नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने नवीन सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

दररोज शेकडो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी तहसील आणि पंचायत समितीत येत असतात. मात्र परिसरात स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींची कार्यालये आणि विविध राजकीय पक्षांचे संपर्क कार्यालये असतानाही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करून आधुनिक स्वच्छतागृह उभारावे, परिसरातील सांडपाणी आणि दुर्गंधीची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या मागणीवर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.