१६२ वर्षांचा इतिहास विसरलेल्या पालिकेला मार्मिकने दाखवला आरसा..! उशिरा का होईना वर्धापन दिन साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
अखेर मार्मिकच्या बातमीचा दणका बसला अन् अमळनेर नगरपालिकेला जाग आली..!काल सकाळी “पालिकेचा १६२ वा वर्धापन दिन सत्ताधाऱ्यांना विसरला..?” अशा आशयाची मार्मिकची बातमी प्रसिद्ध होताच दुपारनंतर नगरपालिकेत अचानक हालचालींना वेग आला. प्रशासन, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना अखेर वर्धापन दिनाची आठवण झाली आणि घाईगडबडीत कार्यक्रम पार पडल्याची चर्चा शहरभर रंगली. दिवसभर शांत असलेल्या पालिकेत दुपारी अचानक झालेली लगबग पाहून नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले. २७ मे १८६४ रोजी स्थापन झालेल्या अमळनेर नगरपालिकेचा इतिहास गौरवशाली मानला जातो. मात्र यावर्षीच्या वर्धापन दिनाकडे सत्ताधारी आणि प्रशासनाने केलेले दुर्लक्ष चांगलेच चर्चेत आले होते.

झोपलेले नगरअध्येक्ष – उपाध्येक्ष शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या नगरपालिकेला स्वतःच्या स्थापनेचा दिवसच लक्षात राहू नये, यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
अखेर मार्मिकने हा मुद्दा उचलून धरताच प्रशासनाला जाग आली आणि उशिरा का होईना कार्यक्रम घेण्याची वेळ आली.
विशेष म्हणजे शहरातील पाणीटंचाई, रखडलेली विकासकामे, निकृष्ट दर्जाचे रस्ते, ठेकेदारांचे वाढते वर्चस्व आणि आर्थिक नियोजनातील गोंधळ अशा अनेक विषयांवर नागरिक आधीच नाराज आहेत. त्यातच वर्धापन दिनासारख्या ऐतिहासिक दिवसाकडे दुर्लक्ष झाल्याने “पालिका फक्त कंत्राटदारांच्या तालावर चालते का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नगरसेवक तर फक्त फोटोपुरते सक्रिय असल्याची टीकाही नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, मार्मिकने स्पष्ट केले आहे की ही आता फक्त सुरुवात असून आगामी काळात शहरातील अनेक गंभीर प्रश्नांवर ठोस आणि परखड लेखन करण्यात येणार आहे. ठेकेदारराज, विकासकामांतील कथित अनियमितता, प्रशासनातील ढिसाळपणा आणि जनतेच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष यावर पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन खऱ्या अर्थाने जागे होणार का, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.