पाळधीला रेल्वे थांबा मिळवण्यासाठी प्रतापराव पाटील यांचे प्रयत्न, पण अमळनेरचं काय अजूनही उपेक्षितच..!
अमळनेर : विक्की जाधव.
धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा मिळावा यासाठी युवा नेते तथा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी थेट मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे आणि भुसावळ विभागाचे डीआरएम पंकज सिंह यांची भेट घेत निवेदन सादर केले. रेल्वे प्रशासनाशी प्रत्यक्ष चर्चा करत पाळधीच्या प्रवाशांचा प्रश्न मांडण्याची धडाडी त्यांनी दाखवली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुत्राने दाखवलेली ही तत्परता आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष म्हणजे हेच रेल्वे अधिकारी अमळनेर रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आले असताना शहरातील अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.
मात्र अमळनेरसाठी प्रेरणा एक्सप्रेससह अनेक महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. खासदारांकडूनही यासंदर्भात कोणतीही ठोस मागणी पुढे आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “पाळधीला प्रयत्न आणि अमळनेरला केवळ प्रतीक्षा” अशी भावना आता नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे.
दुसरीकडे सोशल मीडियावर विविध विषयांवर फेसबुक Live करत जनतेला आवाहन करणारे काही नेते आणि पदाधिकारी रेल्वेच्या मूलभूत प्रश्नावर मात्र शांत असल्याची टीका होत आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीवर कार्यरत असलेल्या भैरवीताई पलांडे यांनीदेखील साधे निवेदन देण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याची चर्चा रंगत आहे. परिणामी “मंत्री पुत्रांना जे जमलं, ते अमळनेरच्या स्थानिक पुढाऱ्यांना आणि खासदारांना का जमलं नाही?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.