अवास्तव MRP विरोधात ग्राहक पंचायतचा एल्गार ; संसदेत मुद्दा गाजणार
अमळनेर : विक्की जाधव.
जीवनावश्यक वस्तूंवरील मनमानी MRP दरामुळे ग्राहकांची होत असलेली आर्थिक लूट थांबवण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी आता थेट संसदेत पोहोचणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने खासदार वाघ यांची भेट घेत MRP नियंत्रणाबाबत निवेदन सादर केले. यावेळी संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला. ग्राहकांच्या न्याय्य मागणीवर संसदेत प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन खासदार स्मिता वाघ यांनी दिल्याने आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने देशभर सुरू असलेल्या MRP विरोधी जनजागृती आंदोलनात उत्पादक कंपन्या वस्तूंवर अवास्तव किंमती छापून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात आला. “एकावर एक फ्री”, “३० टक्के सूट” अशा आमिषांमागे आधीच कृत्रिमरीत्या वाढवलेली MRP असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. जिल्हाधिकारी, तहसीलदार, लोकप्रतिनिधी तसेच केंद्र सरकारपर्यंत ही मागणी पोहोचवण्यासाठी सोशल मीडियासह स्वाक्षरी मोहिमेद्वारे व्यापक जनजागृती सुरू असल्याचे सांगण्यात आले.
डॉ. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात भाईसाहेब मकसूद बोहरी, ॲड. भारती अग्रवाल, सतीश देशमुख, सुधाकर पाटील, स्मिता चंद्रात्रे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडेगावकर, भाऊसाहेब देशमुख, निलेश बडगुजर, मुल्लाजी नुरुद्दीन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. यावेळी अन्न, औषधे व दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील वाढत्या MRP संदर्भात अनेक उदाहरणांसह चर्चा करण्यात आली. उत्पादन खर्चावर मर्यादित नफा ठेवून वैज्ञानिक पद्धतीने MRP निश्चित करणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी, तसेच ग्राहक फसवणुकीवर नियंत्रणासाठी कठोर प्राधिकरण नेमावे अशी आग्रही मागणी करण्यात आली.
दरम्यान, ग्राहकांच्या प्रश्नांवर संसदेत ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन खासदार वाघ यांनी दिल्यानंतर
समाधान व्यक्त केले. मात्र, केंद्र शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास सत्याग्रह, धरणे, साखळी उपोषण आणि देशव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही अखिल भारतीय ग्राहक पंचायतने दिला आहे. “ग्राहकांच्या खिशावरचा डल्ला थांबवण्यासाठी आता निर्णायक लढा उभारणार,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.