झोपलेल्या नगराध्यक्ष – उपाध्यक्ष यांना केव्हा येणार जाग अमळनेर पालिकेचा 162 वा वर्धापन दिन विस्मरणात ? ठेकेदारीत मश्गुल सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड
162 वर्षांच्या इतिहासाला विसरले सत्ताधारी; ठेकेदारीच्या गर्दीत, शहर विकासापेक्षा टेंडरबाजीच महत्त्वाची ?
अमळनेर : विक्की जाधव.
२७ मे १८६४ रोजी स्थापन झालेल्या अमळनेर नगरपालिकेचा आज १६२ वा वर्धापन दिन… मात्र शहराच्या इतिहासाचा अभिमान बाळगण्याऐवजी सत्ताधारी ठेकेदारीच्या व्यवहारात व्यस्त असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. काय हे खरे आहे. नगरपालिकेच्या स्थापनेच्या या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून कोणताही विशेष कार्यक्रम, शहर स्वच्छता अभियान, गौरव समारंभ किंवा नागरिकांशी संवाद आयोजित करण्यात आला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “पालिकेचा इतिहास आठवण्यापेक्षा टेंडर आठवतात,” अशी उपरोधिक बोचरी प्रतिक्रिया देखील उमटत आहे.
२७ मे १८६४ रोजी तत्कालीन प्रशासनाने अमळनेर नगरपालिकेची स्थापना केली होती. त्या काळातील पहिले सभासद म्हणून राजाराम चिंतामण, शेषगीर बाबुराव फौजदार, दौलतराव विठ्ठल देशमुख, विश्वास जयराम देशमुख, हरेकृष्ण गोखले आणि इतर मान्यवरांनी शहर प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली होती. आज त्याच ऐतिहासिक परंपरेचा गौरव करण्याऐवजी पालिकेत फक्त ठेके, मंजुरी आणि कमिशनच्या चर्चाच सुरू असल्याचा आरोप विरोधक आणि नागरिकांकडून होत आहे. शहरातील मूलभूत समस्या कायम असताना वर्धापन दिनीही शहराच्या विकासाचा कोणताही आराखडा जाहीर न झाल्याने नाराजी वाढत आहे.
वर्धापन दिनानिमित्त नगरपालिकेने शहरातील स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी व माजी नगरसेवकांचा सन्मान, पालिकेच्या इतिहासाचे प्रदर्शन, शहर विकास आराखड्याचे सादरीकरण तसेच नागरिकांसाठी खुली चर्चा आयोजित करणे अपेक्षित होते. शहर सुशोभीकरण, पाणीपुरवठा, रस्ते आणि गटारांच्या प्रश्नांवर ठोस घोषणा करून नागरिकांना विश्वास देण्याची ही योग्य संधी होती. मात्र, प्रत्यक्षात ना उत्सव, ना उपक्रम, ना शहराबद्दलची बांधिलकी… त्यामुळे “पालिका फक्त ठेकेदारांची झाली का ?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.