अमळनेर वाहतूक विभाग अॅक्शन मोडमध्ये; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई, तर काहींना दिला समज
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमळनेर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जोरदार कारवाई करण्यात येत आहे.
भर उन्हातही वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक- चौकात व गर्दीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवत हेल्मेट नसणे, ट्रिपल सीट, विनाकागदपत्र वाहने तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. काही वाहनचालकांना नियमांचे महत्त्व समजावून सांगत सामाजिक जाणीव निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या मोहिमेमुळे शहरात वाहतूक शिस्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, अमळनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. भर उन्हातही कर्तव्य बजावत नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. “दंडासोबत प्रबोधन” ही भूमिका घेत पोलिसांनी अनेक वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याबाबत समाज देत जनजागृती केली.

सदर मोहीम अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.