पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची राज्यस्तरावर सुवर्णमय कामगिरी; विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड
अमळनेर : विक्की जाधव.
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा ट्रस्ट मुंबई आयोजित रोबो क्वेस्ट स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात इयत्ता दहावीचे विद्यार्थी कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांनी संगणक व रोबोटिक्स क्षेत्रातील अभिनव प्रयोग सादर करून राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच भविष्यातील अवकाश मोहिमेच्या निमित्ताने त्यांची इस्रो भेटीसाठी निवड करण्यात आल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अशा स्पर्धात्मक वातावरणात पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलने सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक यश मिळवत जिल्ह्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. विद्यार्थ्यांनी भारताला संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता बनविण्याच्या संकल्पनेवर आधारित प्रेरणादायी प्रेझेंटेशन सादर केले. याशिवाय इयत्ता नववीची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील हिने डॉ. होमी भाभा एज्युकेशनद्वारा आयोजित स्पर्धात्मक परीक्षेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात भर घातली. तिचाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक व ज्ञानात्मक दिशा देत शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेल्याबद्दल त्यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, पर्यवेक्षक महेश माळी, मीनाक्षी बारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभल्याची भावना प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांनी व्यक्त केली.